Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

कृतिशील प्रतिभेचे प्रकाशपर्व
- वसंत केशव पाटील
Thursday, March 11, 2010 AT 10:06 PM (IST)
Tags: stambha lekh
महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची दि. 12  मार्च 2010 (आज) रोजी 97 वी जयंती. महाराष्ट्राच्या मातीवर अपार प्रेम असलेल्या या सुसंस्कृत नेत्याच्या कार्याने भारतात आलेल्या प्रकाशपर्वाचा  घेतलेला हा मागोवा...
यशवंतरावांसारख्या सुजाण व सुसंस्कृत, सात्विक नि सुबुध्द, संवेदनशील पण सावध, समंजस तसेच संयमी, साक्षेपी आणि सर्वंकष अशा अभिजात नेतृत्वाच्या साक्षीने देशाला व महाराष्ट्राला एका सर्जनशील ऐतिहाासिक प्रकाशपर्वाचा स्वप्नवत प्रत्यय आला, तो काळ फार जुना नाही. पण सध्याची समग्र गती-रीती आणि अवती-भवतीचे एकूणच भयकारी वास्तव पाहिले की तो इतिहास फार जुना झाला आहे, असे का वाटते ते उमगत नाही. त्याचा सखोल आणि सर्वांगीण मागोवा घेतल्यास अंतर्मुख करणाऱ्या अनेक गोष्टी उघड होतील हे खरे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंतरावांचे विलक्षण व्यक्तिमत्व, त्यांची दूरगामी मौलिक दृष्टी, कसदार कार्यकर्तृत्व आणि कार्यसाधक विवेक या सगळ्याला सार्वकालिकतेची संप्रेरक अशी झळझळीत किनार होती, हे साधे सत्य समोर आले की आपल्या आशा-आकांक्षांना व प्रगतिशील स्वप्नांना पुन्हा नवे धुमारे फुटणार याविषयी आपली खात्री होते! ही किमया यशवंतरावांच्या सानुकंप व सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाची आहे हे सहजच लक्षात येते आणि "साहेब' या शब्दाची शीलवंत सार्थकता व शुभंकर सौहार्द एका अनिवार उत्कटतेने आपणास कवेत घेते आणि महाराष्ट्राची मायमाती गलबलून जाते....यशवंतराव म्हणजे केवढा बुलंद आणि बळवंत महानायक होता, याचे सुखद प्रत्यंतर येते.
नियती वा निसर्ग काही असो, यशवंतरावांमधील "माणसा' ची घडणच अशी काही होती की त्यांच्या माणूसपणाचे विलोभनीय विभ्रम पाहून कोणीही विस्मयचकित व्हावे! असे व्यक्तिमत्त्व एकूण विरळाच.
महाराष्ट्राचे ज्ञानपीठ
महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, महामानव डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्रबाबू, श्री. श्रीप्रकाश, पंडित नेहरू इत्यादी अनेक ज्ञानपीठे आपणांस माहीत आहेत. त्यांच्या पंगतीला आपले पान मांडण्याचा दुर्लभ भाग्ययोग यशवंतरावांनाही साधिकार लाभला होता, ही एक गोष्ट त्यांचे ऐतिहासिक मोल, महत्व आणि स्थान अधोरेखित करायला पुरेशी ठरावी. त्यामुळे यशवंतरावांविषयी लिहिलेल्या विविधांगी साहित्याचा हेवा कोणाही सारस्वताला वाटावा अशी स्थिती आहे यात नवल नाही.
अलीकडच्या काळात ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची अनेक स्तरांवर सर्वदूर अशी चर्चा-चिकित्सा झाली व  होते आहे, असे एकमेव नेतृत्व म्हणून यशवंतरावांचे नाव घेता येईल. वास्तविक पाहता, उत्तम विद्याव्यासंग, अभिजात कलासक्ती आणि अनिवार ज्ञानलालसा असलेल्या सार्वजनिक विभूतींची ऐतिहासिक परंपरा व प्रवाह मुळी तसा क्षणिकच असतो. या परंपरेमध्ये आपल्या नावाची ठळक मुद्रा उमटविणारे अलीकडच्या काळातील ठसठशीत उदाहरण यशवंतरावांचेच!
यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा नि कर्तृत्वाचा मौलिक गाभा "मानवकेंद्री' होता. तरीही एखाद्या विद्वज्जड व कर्मठ पंडिताप्रमाणे शास्त्रकाट्याच्या धारेवर धरुन त्यांनी माणसाची कोरडी परीक्षा पाहिली नाही. मातीच्या मांडीवर मान टाकून मरगळलेल्या, मळलेल्या समाजाला एका सांद्र सहृदयतेने घेणारे सचिंत आणि वत्सल मन यशवंतरावांकडे होते. त्यामुळे राजकारणाच्या बिकट रानावनातही ते निर्मळ, नेमस्त नि नेकच राहिले. आपणाला वाटते, त्यांनी महाराष्ट्राला सहकाराची संथा दिली. आपले शिक्षण-प्रबोधन करून आपणास सुबुध्द केले. कारखाने उभे केले, वगैरे. तसे हे खरेच आहे. पण त्यांनी आपल्या विचारांचा हरवलेला सूर-ताल आपणास मिळवून दिला. हे त्यांचे योगदान किमान बहुजनांना तरी विसरता येणार नाही. विचार काय किंवा ताल-सूर काय मुळातच अमूर्त व अगोचर. त्यामुळे यशवंतरावांचे स्मरण-स्तवन एका सूक्ष्म आणि आंतरिक पातळीवरच होते, होत राहील. आपल्या चर्मचक्षूंना भुरळ घालणारी आणि भ्रष्टाचाराच्या कार्यशाळा चालविणारी स्मारके त्यांच्या नावाने कधीही उभी राहणार नाहीत. कारण अशी स्मारके उभी करून आपल्या हितसंबंधांचे तळे-मळे पिकणार नसतील तर त्याचा लाभ तो काय! हेच त्यांचे वेगळेपण होते.
शिक्षणाचा कायदा
आपले जगणे आणि जीवन साक्षेपाने कळवून घ्यावयाचे तर आधी त्याची कळ गवसली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणासाठी समर्थ संजीवनी दुसरी नाही हे हेरून यशवंतरावांनी दीनदुबळ्यांच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली. तसा ऐतिहासिक कायदाही अंमलात आणला. याचे केवढे तरी साद-पडसाद ग्रामीण साहित्यात पडल्याचे दिसते. साहित्य-कलाविषयक आणि समाज-संस्कृतीविषयक अनेक नावीन्यपूर्ण योजनांना त्यांनी दिलेली सक्रिय गती कोणीही विसरू शकत नाही. खरे तर, ज्यांच्यावर शासन करावयाचे त्यांना अडचणी ठेवण्यातच खरा शहाणपणा असतो, हे बहुतेक राजकारण्यांचे मुख्य सूत्र असते, पण यशवंतरावांनी ही गोष्ट कधीही मानली नाही. दुबळ्या माणसाला आधी त्यांनी आवाज दिला आणि नंतर त्याला त्याचे जीवनगाणेही दिले. महाराष्ट्रापुरते का होईना पण त्यांचे हे ऋण खूप मोठे आहे. अज्ञान आणि गरिबी यांमुळेेच बहुतेक प्रश्न निर्माण होतात, हे तर्कशास्त्र तसे फार अवघड नाही. पण ते राजकारण्यांच्या अडचणीचे असते. यशवंतरावांनी या कृतक अडचणीतून मार्ग शोधून एक व्यापक सामाजिक-सांस्कृतिक पट काय असू शकतो हे सोदाहरण दाखवून दिले, हे त्यांचे थोरपण. ते केवळ राजकारणी असते तर हा उद्योग त्यांनी खचितच केला नसता. सक्रिय राजकारणाच्या यज्ञकुंडामध्ये सतत अग्रभागी राहूनही त्यांनी ज्या मनस्वीपणे आपली लेखणी चालविली त्याला नजिकच्या काळात तरी तोड नाही. त्यांनी सौ. वेणूताईंना लिहिलेली नितांत सुंदर अशी काव्यपूर्ण पत्रे एव्हाना संकलित रुपात प्रकाशित झाली आहेत. यशवंतरावांच्या मर्मबंधातील ठेव म्हणून त्यांचे यथोचित कौतुकही झाले आहे. पण अजूनही आपल्या स्नेह-सहवासातील कित्येक लेखक-कलावंतांना लिहिलेली शेकडो पत्रे अप्रकाशित आहेत.
धकाधकीच्या आणि ताणतणावग्रस्त राजकारणातून  वाट वाकडी आणि अंमळ वेळ काढून आवर्जून अगत्याने भेटायला येणाऱ्या यशवंतरावांच्या आठवणी क्रांतिसिंह नाना पाटलांकडून मी समक्षच ऐकल्या आहेत. म्हणूनच यशवंतरावांसारखा लोकसखा मुलखावेगळा वाटतो.
श्रमिक संस्कृतीचा पुजारी
शिक्षण आणि सहकार यांशिवाय कोणतीही गती-प्रगती साधत नाही ही गोष्ट यशवंतरावांनी उत्स्फूर्त उत्कटतेने अनुभवलेली होती. त्यामुळेच महात्मा फुले, शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील या त्रयीचे एक अभिनव असे वेगळे रूप यशवंतरावांमध्ये समन्वित झाले होते. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासातील या प्रस्तुत अध्ययाचे पुरेसे अनुशीलन झाल्याशिवाय नजिकच्या भविष्यकाळात बहुजनांची भाग्यरेखा पूर्णांशाने उजळून निघेल असे वाटत नाही.
यशवंतरावांचे साहित्य, त्यांची कलासक्ती आणि विशेष म्हणजे त्यांची रसिकता यांविषयी पुष्कळ चर्चा होताना दिसते. मुळामध्ये रसिकता व सर्जनशीलता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यातील सुंदर समन्वय आणि समतोल यशवंतरावांमध्ये ज्या क्षमतेने प्रगटला होता तीही त्यांची म्हणून एक वेगळीच ओळख होती. यशवंतरावांचे चौफेर वाचन आणि चिकित्सक चिंतन ज्या अलवारपणे त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त झाले तसेच ते त्यांच्या भाषणांमधूनही मुखरित झाले. त्यांचे भाषण म्हणजे अभिजात संगीताची एक मैफलच वाटावी, इतके ते रससिध्द आणि रससिक्त असे. आपले मन, बुध्दी आणि जीवन या साऱ्यांची त्यांनी ज्या मन:पूर्वकतेने मशागत केली होती, त्याचा अभ्यास आणि समीक्षा फारशी झालेली नाही. संथ नि लयबध्द असे स्पष्ट उच्चार, माफक हावभाव, विचार-व्यूहातील आरोह-अवरोह व त्यांचे पारदर्शक विश्लेषण, श्रोत्यांविषयी असलेला आदर व अगत्य. ठाम, पण नम्र निवेदन-शैली, कुठेही अभिनिवेशाचा अवखळ वारा नाही. बेतशीर नि सहजपणे येणारे ओघवते संदर्भ, अनावश्यक आव नाही की भिंगुळवाणा भाव नाही. श्रोत्याला बधीर न करता त्याला विचारांच्या व्यापक क्षितिजाकडे सहजपणे घेऊन जाणारे शब्दाशब्दातून लळाजिव्हाळा भरलेले. भोगलेल्या क्षणांची एखादी भावविभोर करणारी सर..असे बरेच काही त्यांच्या भाषणात असे.
यशवंतराव कोणी संत-मुनी नव्हते की प्रेतिष! तरीही, त्यांनी तळ्यात-मळ्यात, चिखल पाण्यात, माळावरील दगड-धोंड्यात, गिरण्या-कारखान्यात सदैव राबणारा कष्टकरी हीच देशाची खरीखुरी दौलत मानली, हे त्यांच्या राजकारणाचे मोठेच वैशिष्ट्य ठरावे!
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे' अशी प्रतिज्ञा करून मी यशवंतराव चव्हाण होणार असे म्हणणारे यशवंतराव यशवंत झाले, पण आपण त्यांचा देव करून त्यांची पोकळ पूजा बांधली. खरे तर महाराष्ट्राची मायमाती एका यशवंतरावांची नव्हे, यशवंतांच्या मांदियाळीची आजही वाट पाहाते आहे.
              
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: