Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

हमखास उत्पन्नाचा मार्ग
ऐक्य समूह
Thursday, May 26, 2011 AT 01:19 AM (IST)
Tags: stambha lekh
कोणत्याही पदार्थात सर्रास वापरली जाणारी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली म्हणून हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहजिकच हळदीला बारमाही चांगली मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हळदीची मागणी वाढत असून तिला दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे हळदीच्या लागवडीला चांगला वाव आहे. माळरानावर आणि कोरडवाहू क्षेत्रातही चांगले उत्पादन देणाऱ्या या पिकाच्या लागवडीविषयी.
प्रत्येक घरात स्वयंपाकात वापरात येणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हळद. हळदीचे औषधी गुणधर्म तर साऱ्यांनाच माहीत आहेत. या शिवाय हळदीला आपल्या संस्कृतीत, परंपरेत मानाचे स्थान देण्यात आले आहे. दररोज वापर करणे भाग असल्यामुळे हळदीला कायम चांगली मागणी असते. अलीकडे हळदीची बाजारपेठ विस्तारत असल्याने तिची मागणीही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळदीला मोठी मागणी असून तिला दरही चांगला प्राप्त होतो. त्यामुळे हळदीची लागवड शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरणारी आहे. जगातील हळद उत्पादनापैकी सुमारे 80 टक्के उत्पादन भारतात होते. देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर प्रथम क्रमांक आंध्र प्रदेशचा लागतो. त्यानंतर ओरिसा, तमिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशी क्रमवारी दिसून येते. यावरुन हळदीच्या उत्पादनाबाबत आपण बरेच मागे असल्याचे दिसते. ही परिस्थिती बदलायला हवी.
महाराष्ट्रात हळदीच्या पिकाखालील क्षेत्र 8500 हेक्टर इतके असून राज्यात एकूण 42 हजार 500 मेट्रिक टनाचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी हळदीच्या उत्पादनवाढीस आपल्याकडे वाव आहे. मात्र, त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचा सातत्याने विचार व्हायला हवा. त्यातही हळदीच्या दरातील चढ-उतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रीय खताची कमतरता, मोठ्या प्रमाणावर करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पध्दतीने काढणी इत्यादी बाबींचा विचार गरजेचा ठरतो. तसे झाल्यास हळदीचे जास्तीत जास्त उत्पादन घेणे सहज शक्य होईल.
हुकमी उत्पादन
राज्यात हलक्या तसेच माळरान जमिनीतसुध्दा हळदीचे पीक घेता येते. मात्र, या जमिनीची सुपिकता वाढवणे, पोत सुधारणे, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे आणि जमिनीची चांगली मशागत करणे याकडे लक्ष दिले जायला हवे. तसे झाल्यास माळरानावरही हळदीची लागवड फायदेशीर ठरू शकते.  हळदीचे पीक शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीत घेण्याचे टाळावे. कारण अशा जमिनीतील पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होत नाही. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हळदीच्या सुधारित जातींमध्ये फुले स्वरुपा ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर पीक उंच वाढणारे आहे. या जातीच्या पिकांच्या पक्वतेचा काळ साडे आठ महिन्यांचा असून फुटव्यांची संख्या दोन ते तीन प्रती झाड इतकी असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाने 50 ते 55 ग्रॅम असतात. याची हळकुंडे 35 ते 40 ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदास सात ते आठ हळकुंड आढळून येतात. या जातीचे बियाणे आणि त्याच्या उत्पादनाचे 1:5 असे आहे. ही कुंडे सरळ, लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असतो. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारित असलेल्या जातींपेक्षा जास्त म्हणजे 5.19 टक्के इतके असते. या पिकाचा उतारा 22 टक्के इतका मिळतो. या जातीच्या पिकाचे ओल्या हळदीचे सरासरी उत्पादन 358.30 क्विंटल प्रति हेक्टरी असल्याचे दिसून आले आहे. तर वाळलेल्या हळदीचे उत्पादन 78.82 क्विंटल प्रति हेक्टर असल्याची नोंद आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या जातीतील पिकात पाण्यावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे. या शिवाय हळदीत सेलम, कृष्णा, राजापुरी, कस्तुरी किंवा रानहळद, ईस्ट इंडियन ऍरोरुट, आंबेहळद, काळी हळद, कचोरा अशा अनेक जाती उपलब्ध आहेत.
हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. ठिकठिकाणी तेथील प्राप्त परिस्थितीनुसार याच्या लागवडीचा कालावधी मागे-पुढे होत असतो.हळदीच्या लागवडीसाठी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. मुख्य म्हणजे याच्या लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या बियाण्यांची सुप्तावस्था संपलेली असावी. बियाण्यांचे डोळे नकळत फुगलेले असावेत. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. हळदीच्या लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालते. मात्र, हे बियाणे 20 गॅ्रमपेक्षा अधिक वजनाचे असावे. हळदीची लागवड सरी वरंबा पध्दतीने करायची झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूस 30 सेंटीमीटर अंतरावर कुदळीने आगाऱ्या घेऊन लावाव्यात. रुंद वरंबा पध्दतीने 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर गड्डे लावून घ्यावेत. लागवडीच्या वेळी हे गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
हळदीची प्रतवारी
हळदीच्या लागवडीसाठी गादीवाफे अधिक चांगले ठरतात. याच्या लागवडीसाठी एकरी 1000 क्विंटल बियाणे लागते. हळदीची लागवड मातृकंदापासूनही केली जाते. या कंदांपासून तयार केलेल्या 30 दिवस कालावधीच्या रोपांपासूनही याची लागवड करता येते. हळदीच्या लागवडीसाठी कन्या कंदही वापरता येतो. हळदीच्या बेण्यावर बीजप्रक्रिया करावी लागते. तसेच हळदीच्या लागवडीनंतर अडीच ते तीन भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. हळदीची लागवड करताना संपूर्ण कंद झाकला जाईल याची काळजी घ्यावी. भरणी केल्यामुळे हळकुंडाची वाढ चांगली होते. भरणी न केल्यास जमिनीच्या बाहेर आलेल्या हळकुंडाची वाढ होत नाही. परिणामी उत्पादनात दहा ते 15 टक्के घट येेते.
हळदीच्या लागवडीबरोबरच त्याच्या काढणीबाबतही विशेष काळजी घ्यावी लागते. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी पिकाची काढणी साडे आठ ते नऊ महिन्यांनी करावी. त्यानंतर हळदीची प्रतवारी करुन ती योग्य पध्दतीने शिजवली जाते. हळद शिजवल्यानंतर ती सुरूवातीचे चार ते पाच दिवस तीन ते चार इंचाचा थर देऊन वाळवावी. नंतर या हळदीला आठ ते दहा दिवस चांगले ऊन द्यावे. अशी वाळलेली हळद विक्रीसाठी पाठवण्यापूर्वी त्याला पॉलिश करणे आवश्यक असते. वाळलेल्या हळकुंडावरील रखरखीत साल काढून टाकणे. म्हणजे तिला पॉलीश करणे होय. पॉलिश केल्यावर हळदीची प्रतवारी करावी. हळदीच्या यशस्वी लागवडीसाठी निरोगी बियाणे, योग्य प्रकारची खते तसेच जमिनीचा पोतही लक्षात घ्यायला हवा. अशा पध्दतीने नियोजनपूर्वक आणि वेगवेगळ्या बाबींचा विचार करुन हळदीची लागवड केल्यास ती निश्चितच यशस्वी ठरते.
जमिनीचा कस
गेल्या काही वर्षात हळदीला अक्षरश: सोन्याचा भाव मिळू लागला आहे. ऊस आणि अन्य बागायती पिकापेक्षाही हळदीच्या पिकाला चांगले उत्पन्न मिळते. हळदीच्या दरात घसरण तर होत नाही, उलट हळदीचा वायदे बाजार असल्यामुळे हळदीला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी ऊस आणि अन्य पिके घेण्यापेक्षा हळदीचे पीक घेतल्यास, त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. हळद पाण्याचा ताणही सहन करू शकते. त्यामुळे उसापेक्षाही हळदीला पाणी कमी लागते. सेंद्रिय आणि शेणखतांचा वापर केल्यास उत्पादनही अधिक मिळू शकते. हेक्टरी सरासरी 70 मेट्रिक टन उत्पादन मिळाल्यास एकरी पन्नास साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, ही बाब लक्षात घेतल्यास, बागायतदार शेतकऱ्यांनी हळदीच्या पर्यायी पिकाचा विचार करावा आणि शेतीचा पोतही कायम राखावा. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी खारावत आहेत. या पार्श्वभूमीवर हळदीची लागवड जमिनीचा सामू कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
विविध खाद्यपदार्थांना रंग आणि चव येण्यासाठी तसेच औषधी म्हणूनही हळदीचा उपयोग होतो. त्यामुळे हळदीची मागणी बारमाही टिकून असते. याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. त्या दृष्टीने हळदीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणे गरजेचे आहे.
- प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: