Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पं. रघुनंदन पणशीकरांच्या भक्तिगीतांनी समर्थभक्त मंत्रमुग्ध
ऐक्य समूह
Sunday, February 12, 2012 AT 01:35 AM (IST)
Tags: news

 सातारा, दि. 11 ः श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी  संगीत महोत्सवातील तिसरे गायनपुष्प प्रख्यात गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी समर्थ चरणी अर्पण केले. तिसऱ्या दिवशीच्या दासनवमी संगीत महोत्सवात 2 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या कार्यक्रमात पं. पणशीकरांनी प्रभू श्रीराम, विठ्ठल, श्रीकृष्ण आदी देवांची भक्तिगीते, भजने व अभंग सादर केले.
आपल्या गायन सेवेची सुरुवात  ..सुमिरन कर रामनाम.. या  बंदिशीने केली. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या.. तो हा राम आठवावा.. हे पद म्हणून संत एकनाथ महाराजांनी त्याकाळी होणाऱ्या म्लेच्छांच्या उपद्रवालाही सामोरे जाताना नराच्या मार्गाने जात नारायण कसा होतो या बाबतचे रचलेले.. अहो नारायणा, सांभाळावे आम्हा दिना, आमुची राखावी लाज.. हे पद सुरेखपणे सादर केले. त्यानंतर कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील.. मुरलीधर शाम हे घन:श्याम.. हे नाट्यगीत सहगायक सौरभ काडगावकरने तितक्याच तयारीने म्हणत टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. आपल्या आवाजातील मार्दवता दाखवत पं. रघुनंदजींनी यावेळी समर्थ रामदास स्वामींच्या रचलेल्या व मनाला आवर घाला हे सांगणाऱ्या मना, धीर धरी, राहे स्थिर तू मना.. हे पद सादर केले. समर्थ रामदास स्वामींवरील बनविलेल्या केदारीराम या पं. पणशीकरांच्या ऑडिओ कॅसेटमधीलअनेक पदे यावेळी त्यांनी सादर केली. यानंतर दिवसभरात.. अहो, वेळच मिळत नाही, असे सांगणाऱ्या प्रत्येकासाठी रामनामाचा जप कसा कराल व वेळ कसा दवडू नका हे सांगणारे .. घटिका गेली, पळे गेली, तास वाझे झणाणा.. हे भजन सुरेखपणे सादर केले. 
समर्थ रामदासांचे समकालीन असे संत तुकारामांनीविठ्ठलाला तर समर्थांनी रामरायाला समाजोन्नती व राज्योन्नती करता आपलेसे केले. याच तुकारामांचा.. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे.. हा अभंग अतिशय सुरेखपणे सादर केला. या कार्यक्रमात एकाच सुरावटीमधील 3 अभंग सलग सादर करीत पं. रघुनंदनजींनी यात ..जानकी नाथ सहायकरे.. पायोेजी मैने रामरतन धन पायो..व .. श्री अनंता, मधूसुदना, पदुमनाभ नारायणा.. हे अभंग सादर होताना श्रोत्यांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात त्यांना साद दिली. यानंतर.. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एकची झाला .. या पदाने आपल्या संगीत सेवेचा त्यांनी समारोप केला. समर्थ चरणी गायन सेवा सादर करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री समर्थ सेवा मंडळाचे त्यांनी आभार मानले.
पं. रघुनंदन पणशीकर यांना भरत कामत यांनी तबल्यावर, तन्मय देवचके यांनी संवादिनीवर, सौरभ काडगावकर यांनी गायनाची व माउली टाकळकर यांनी टाळावर साथ केली. राजेंद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. समर्थ सेवा मंडळाच्यावतीने कार्यवाह मारुतीबुवा रामदासी यांनी रामनामी, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सर्व कलाकारांचा सत्कार केला.
पुणे येथील संयोजक गोविंदराव बेडेकर, समर्थ भक्त जनार्दन बुवा शेवडे, रमेशबुवा शेंबेकर, योगेशबुवा रामदासी, मकरंदबुवा रामदासी तसेच राज्यातून विविध ठिकाणाहून आलेले समर्थ भक्त उपस्थित होते. दि. 12 रोजी सायंकाळी रामभक्त निवासात सौ. रुचिरा काळे व ऋषिकेश बोडस यांचे शास्त्रीय  गायन होणार असून त्यांना राजीव परांजपे व प्रसाद जोशी  साथसंगत करणार आहेत.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: