Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चारुदत्त आफळे व कलाकारांनी घडवला संगीत नाटकाचा प्रवास
ऐक्य समूह
Sunday, March 11, 2012 AT 12:58 AM (IST)
Tags: *
सातारा, दि. 10 : कट्यार काळजात घुसली या नाटकाचे सुंदर सादरीकरण करुन पुणे येथील ज्येष्ठ गायक व अभिनेते चारुदत्त आफळे व सहकलाकारांनी  सातारकर रसिकांना संगीत नाटकाची मेजवानीच दिली. संयोजन सप्तरंग कला अकादमीच्यावतीने यावर्षीच्या नाट्यरसिक परिवार योजनेतील चौथे पुष्प शाहू कलामंदिरात रंगलेल्या या संगीत नाटकाने गुंफले.
सध्याच्या धावपळीच्या जगात पडद्याआड जाऊ पाहणाऱ्या संगीत नाटकांना रसिक प्रेक्षकांपुढे सादर करुन अनोख्या मराठी नाट्यगीतांचा नजराणाच कलाकारांनी पेश केला. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेल्या या नाटकाची सुरुवात "जय नटेश्वर'ने झाली. त्यानंतर "घेई छंद मकरंद', "सावरियॉं लगी कलेजवा कट्यार' आणि पुन्हा "घेई छंद'चा हा प्रवास साडेतीन तास सुरू राहिला. मध्यंतरात सुजय जोशी यांनी सप्तरंगच्या चौथ्या पर्वाच्या रसिक परिवार योजनेची माहिती दिली. सातारकरांचा वाढता पाठिंबा ही सप्तरंगच्या कार्याची पोचपावती असून नव्या वर्षाची नोंदणी उद्या, दि. 11 रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत राजवाडा येथील हत्तीखाना शाळेत सुरू होणार आहे. दि. 12 ते 18 मार्च दरम्यान राजपथावरील आर्यांग्ल मेडिकल स्टोअर्समध्येही ही सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी सप्तरंगच्या संस्थापक-विश्वस्त
श्रीमती शैलजा पाठक, अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष हेरंब जोशी, मधुसूदन पत्की, भास्कर मेहेंदळे, मंदार जोशी, विशाल देशपांडे, अमित कोडक, सभासद उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: