Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

जलशिवार योजनेत कोट्यवधीचा गैरव्यवहार
ऐक्य समूह
Friday, September 11, 2015 AT 11:13 AM (IST)
Tags: mn4
ई-निविदा न काढता कंत्राट : काँग्रेसचा आरोप
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : तीन लाख रुपयांवरील कामाचे कंत्राट केवळ ई-निविदेद्वारेच दिले जावे, हा आदेश बदलून जलशिवार योजनेची कोट्यवधी रुपयांची कंत्राटे वाटण्यात आली असून त्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचाराचे ‘मलयुक्त शिवार’ बनले आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘जलयुक्त शिवार’ हा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी शेकडो कोटींच्या घरात खर्च येणार आहे; पण या प्रकल्पासाठी ई-निविदा पद्धतीने निविदा न काढता प्रचलित पद्धतीने निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप सावंत यांनी केला. तीन लाखांपेक्षा अधिक खर्च असणार्‍या कामांसाठी ई-निविदा पद्धतीचा  अवलंब करण्याचा निर्णय 26 ऑक्टोबर 2014 रोजी झाला आहे; पण भाजप मंत्रिमंडळाने 2015 मध्ये ठरवलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी तो निर्णय बदलण्यात आला. लातूर जिल्ह्यातील कामांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली तेव्हा ई-निविदेद्वारेच काम देण्यात येईल, असे सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले होते. मात्र, नंतर आपणच काढलेल्या आदेशात सरकारने बदल केला. अधिकार्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेण्याचे प्रकार झाले आहेत. त्याची न्यायालयीन चौकशी केल्यास हे आदेश कोणाच्या सांगण्यावरून काढले हे बाहेर येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवारच्या एकेका प्रकल्पासाठी 16 ते 18 लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र, काम 25 हजारांचेही झालेले नसल्याचा आरोप सावंत यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: