Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

हेल्मेट सक्ती आता संपूर्ण राज्यात लागू
ऐक्य समूह
Saturday, January 02, 2016 AT 11:12 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्यातील वाहतूक नियम नवीन वर्षापासून अधिक कडक करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला असून हेल्मेट सक्ती आता संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा फास अधिक आवळण्यात आला असून त्यांना पोलीस कारवाईबरोबरच तीन महिन्यांसाठी परवानाच गमावावा लागणार आहे.
मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे कार्यान्वित झाल्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवणार्‍यांचे गुन्हे आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये बंदिस्त होणार आहेत. त्यामुळे  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारणे वाहतूक पोलिसांना आणि परिवहन अधिकार्‍यांना अधिक सुलभ झाल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. हेल्मेट सक्ती आता केवळ मुंबईपुरती नाही तर संपूर्ण राज्यात लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सीटबेल्टबाबतचे नियमही आता राज्यभर लागू करण्यात आले आहेत. हेल्मेट आणि सीटबेल्टचे नियम न पाळणार्‍यांना आता आरटीओ कार्यालयात समुपदेशनासाठी किमान दोन तास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण घटले
गत वर्षात मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने तळीराम वाहनचालकांची संख्या घटली आहे. 2015 मध्ये 14 हजार 602 तळीरामांवर कारवाई झाली. 2014 मध्ये ही संख्या 16 हजार 13 होती. विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याविरोधात 2014 मध्ये 21 लाख 342 वाहनचालकांवर कारवाई झाली होता. गतवर्षी ती तब्बल 5 लाखांनी घटून 16 लाख 118 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: