Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

केजरीवालही त्यातलेच!
vasudeo kulkarni
Tuesday, May 09, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: ag1
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकारी मंत्र्याकडून थोडी थोडकी नव्हे, तब्बल दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाने, या नेत्याची तथाकथित नैतिकता, साधन शुचितेची ढोंगबाजी अखेर चव्हाट्यावर आली आहे. केजरीवाल यांनी ही प्रचंड लाच घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला नाही. काल परवापर्यंत दिल्ली सरकारमध्ये जलमंत्री आणि एक काळ केजरीवाल यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी असलेल्या कपिल मिश्रा यांनीच हा आरोप केल्यामुळे, राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. हा आरोप जाहीरपणे करण्यापूर्वी मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन, केजरीवाल यांच्या लाचखोरीबद्दल लेखी तक्रार दिली आहे. महात्मा गांधीजींच्या राजघाट परिसरातील समाधीला आदरांजली वाहून त्यांनी पत्रकार परिषदेतच हा जाहीर आरोप केजरीवाल यांच्यावर करताना, आपण याबाबत चौकशी झाल्यास सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला माहिती देण्यास तयार असल्याचेही आव्हान त्यांनी दिले आहे. केजरीवाल हे स्वच्छ आणि निष्कलंक असतील, असे आपल्याला वाटत होते. पण गेली दोन वर्षे ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, ते नेते भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत आकंठ बुडाल्याचे आपण समक्षच पाहिले. आरोग्य आणि वाहतूक मंत्री सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानीच दोन कोटी रुपयांची रोख रक्कम आपल्या समक्ष दिली. या पैशाबाबत केजरीवाल यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत, राजकारणात सर्वच घटनांचे स्पष्टीकरण देता येत नाही, असे सांगून आपल्याला गप्प केले. केजरीवाल यांच्या नातेवाईकांसाठी पन्नास कोटी रुपयांचा जमिनीचा व्यवहार आपण केला होता, असे जैन यांनी या आधी आपल्याला सांगितल्याचेही म्हणणे आहे. या आधीही जमिनींच्या घोटाळ्याचे आणि बेकायदेशीरपणे पैसे जमवल्याचे आरोप जैन यांच्यावर झाले आहेतच आणि त्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे. अशा घोटाळ्यातूनच मिळवलेले पैसे त्यांनी केजरीवाल यांना दिल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे. दिल्लीकरांना होणारा अस्वच्छ पाण्याचा पुरवठा, पाण्याच्या बिलातील गडबडीबाबत दोषी ठरवून, गेल्या शनिवारीच केजरीवाल यांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली होती. जलमंडळाच्या अध्यक्षपदावरूनही त्यांना काढून टाकले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात मिश्रा यांनी केजरीवाल आणि त्यांच्या टोळीविरुध्द आक्रमक पवित्रा घेत हा नवा गौप्यस्फोट केल्यामुळे, गेल्या दोन वर्षांच्या  गलथान कारभार आणि आम आदमी पक्षातील काही आमदार, मंत्र्यांवर झालेल्या आरोपांनी बदनाम कलंकित झालेल्या केजरीवाल यांच्या तथाकथित स्वच्छ प्रतिमेच्या लौकिकाला या नव्या आरोपाने चूड लागली. या आरोपाचे उत्तर केजरीवाल यांनी दिलेले नाही. त्यांचे निकटचे सहकारी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांनी घाई गडबडीने हा आरोप बिनबुडाचा आणि खोटा असल्याचा खुलासा केला असला तरी, सर्वसामान्य जनतेला तो मुळीच पटणारा नाही. आग असते तेव्हाच धूर येतो, या तर्कशास्त्राच्या सिध्दांतानुसार, मिश्रा यांच्या आरोपाने संशयाच्या वादळात सापडलेल्या केजरीवाल यांची चौकशी झाल्याशिवाय, ते मुळीच निष्कलंक ठरू शकत नाहीत.   

अत्युच्चपदी थोरही बिघडतो
अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा, या सुभाषिताची प्रचिती केजरीवाल यांच्या गेल्या दोन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीेने दिल्लीकर आणि देशातील जनतेलाही अल्पावधीतच आली. सर्वार्थाने लोकसेवक असलेल्या अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीत लोकपालासाठी केलेल्या जनआंदोलनात केजरीवाल आघाडीवर होते. दिल्लीत आणि देशभरात या आंदोलनाला विराट पाठिंबाही मिळाला होता. ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’, या स्वयंसेवी संस्थेद्वारे केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागरण करीत होते. स्वच्छ प्रतिमेचा लढाऊ नेता, अशी त्यांची प्रतिमा हजारे यांच्या त्याच आंदोलनामुळे झाली. त्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत, त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. अशा राजकीय पक्षाच्या स्थापनेला केव्हाही हजारे यांचा विरोध होता आणि तो कायमही राहिला. आता केजरीवाल यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खुद्द हजारे यांनीच, आपल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे, अशा शब्दात आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भ्रष्टाचाराच्या आरोपावर दिल्लीच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी राजीनामा दिला, तेव्हाच भ्रष्टाचारमुक्तीचे स्वप्न भंगले, अशा शब्दात त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. दिल्ली विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत 70 पैकी  67 जागा जिंकून केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सत्तेवर आला होता. स्वच्छ आणि लोकाभिमुख कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासह दिल्लीकरांना नागरी सोयीसुविधांची ग्वाही त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांचा कारभार लोकहिताच्या विरोधातच राहिला. माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशी त्यांनी सातत्याने श्रेष्ठता आणि अधिकारासाठी संघर्ष केला. जाहीरपणे त्यांच्यावर आरोपही केले. न्यायालयातही वाद नेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोपांची प्रचंड चिखलफेक केली. सामान्य जनता आणि सरकारचे नाते केव्हाच तुटले. अन्य पक्षांच्या मंत्र्यांच्या प्रमाणेच केजरीवाल आणि त्यांचे मंत्री ऐषआरामात रहायला लागले. आमदारांना दरमहा पाच दहा लाख रुपयांचे वेतन मिळण्यासाठीचे विधेयकही त्यांनी विधानसभेत मंजूर करून घेतले. त्यांच्या सहकारी मंत्र्यांवर भ्रष्टाचार, गैरव्यवहार, सामान्य जनतेशी घमेंडखोर वागणूक यासह अनेक आरोप झाले. आम आदमी पक्षाच्या स्थापनेत सहभागी असलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह अनेक नेत्यांची केजरीवाल यांनी हुकूमशाही पध्दतीने पक्षातून हकालपट्टी केली. अहंकाराने पछाडलेल्या या नेत्याला आपण लोकसेवक आहोत, याचा पुरता विसर पडला.  नैतिकता आणि साधनशुचितेचे ढोल वाजवणार्‍या या नेत्याची ढोंगबाजी चव्हाट्यावर आली. ते आणि त्यांच्या पक्षाने, नेत्यांनी जनतेचा विश्‍वास गमवल्यानेच, अलीकडेच झालेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकातही संतप्त जनतेने त्यांच्या पक्षाला पराभवाचे पाणी पाजले. आता खुद्द केजरीवाल यांच्यावरच लाचखोरीचा आरोप झाल्याने, आम आदमी पक्षाचे हे भरकटलेले जहाज लवकरच बुडेल, हे नक्की!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: