Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

‘जंक फूड’ला बंदी
vasudeo kulkarni
Wednesday, May 10, 2017 AT 11:52 AM (IST)
Tags: ag1
मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक आणि विविध आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या ‘जंक फूड’वर शाळांच्या उपहारगृहात बंदी आणण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय लोक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचाच आहे. मुक्त आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या अंमलबजावणीनंतर देशात पाश्‍चात्य चंगळवादी संस्कृती रुजली आणि फोफावली. पाश्‍चात्य खाद्य पदार्थांची चटक शहरी-ग्रामीण भागातील लोकांना लागली. ज्यादा मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ असलेल्या या कमी पोषण मूल्यांच्या पाश्‍चात्य पदार्थांमुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकारांसह अनेक विकार बळावत असल्याचा इशारा यापूर्वी देशातील वैद्यकीय आणि आरोग्य तज्ञांनी वारंवार दिला आहे. आता जंकफूड खाण्याचे हे वेड शालेय विद्यार्थ्यांत अधिकच वाढल्याने, सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही मधुमेह, हृदयविकारसारख्या रोगांनी पछाडल्याचे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणातही निष्पन्न झाले आहे. आता हैद्राबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेच्या अभ्यास गटाने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात जंकफूड खाणार्‍या विद्यार्थ्यांना लठ्ठपणासह विविध गंभीर आजार होत असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्या संस्थेच्या शिफारशीनुसार शाळांच्या उपहारगृहात जंकफूड ठेवण्यास, त्यांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार शाळांच्या उपहारगृहात यापुढे तळलेल्या बटाटा चिप्स, पिझ्झा, बर्गर, नुडल्स, पास्ता, मॅगी, पाणीपुरी, पेढे, कलाकंद, जिलेबी, बुंदी, इम्रती हे पदार्थ ठेवता आणि विकताही येणार नाहीत. याशिवाय शर्करायुक्त बिस्किटे, बन्स, पेस्ट्री, जाम, जेली, शितपेये, बर्फाचे गोळे, हे पदार्थही विकता आणि ठेवता येणार नाहीत. आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणार्‍या या पदार्थांच्या ऐवजी आरोग्याला आणि शरीराला पोषक असलेल्या गव्हाची रोटी, पालेभाज्या, भात, भाजी, पुलाव, राजमा, उपमा, कढी, अंडी, इडली-वडा सांबार, ताक-दही, नारळाचे पाणी, जलजिरा, असे पदार्थ विक्रीसाठी शाळातील उपहारगृहांनी विक्रीसाठी ठेवावेत, असा आदेशही शासनाने सर्व शाळांना पाठवला आहे. पिझ्झा, बर्गर आणि साखर, मैदायुक्त पदार्थांच्या अतिखाण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढते आहे आणि असे पदार्थ खाण्याने विद्यार्थ्यांचे आरोग्यही बिघडत असल्याने, शाळाचालक, शिक्षक, पालक या सर्वांनीच या महत्त्वाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अशा घातक पदार्थांपासून दूर ठेवावे, असेही सरकारने या आदेशात नमूद केले आहे. जंकफूड खाण्यामुळे आरोग्याची होणारी हानी आणि विविध आजारांची माहिती शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना द्यावी. त्यांनी जंकफूडपासून दूर रहावे, यासाठी व्यापक पातळीवर शिक्षक आणि पालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही सरकारने केले आहेत. शाळांच्या उपहारगृहात असे आरोग्याला घातक असलेले पदार्थ ठेवता तर येणार नाहीतच, पण या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यातील सर्व शाळांच्या व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे.          

पालकांचीही जबाबदारी
मॅगी, बर्गर, पिझ्झा, पास्ता, हे पाश्‍चात्य पदार्थ चवीला चटकदार असल्याने, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतही हे पदार्थ खाण्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. श्रीमंत, मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांचे फाजील लाड तर करतातच, पण त्यांच्या हट्टासाठी असे चटकदार पदार्थ उपहारगृहात आपल्या मुलांना नेऊन खाऊही घालतात. दिल्ली, बंगलोर, मुंबई, कोलकाता या शहरातील खाजगी प्राथमिक शाळातील मुला-मुलींना दुपारच्या डब्यातूनही सँडविच, पिझ्झा देणार्‍या मातांची संख्या खूपच असल्याने, दिल्ली सरकारने डब्यातून मुलांना असे पदार्थ देऊ नयेत, असे आदेश चार वर्षांपूर्वीच काढले आहेत. शहरी परिसरातील बहुतांश शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना हे चटकदार पदार्थ खाणे आवडते आणि त्यांच्या पालकांनाही असे पदार्थ देणे प्रतिष्ठेेचे वाटते, ही सामाजिक शोकांतिका होय! राजधानी दिल्लीतील प्राथमिक शाळातील चौथी ते सातवी इयत्तेत शिकणार्‍या  विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या केलेल्या सर्वेक्षणात आठ ते दहा वयोगटातील सरासरी पंचवीस टक्के मुले-मुली लठ्ठ झाल्याचे निष्पन्न झाले होते. जंकफूड पदार्थांमुळेच अल्पवयात मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या भावी आयुष्याचा आणि आरोग्याचा गंभीर विचार करून जंकफूडच्या सवयीतून आपली सुटका तर करून घ्यावीच, पण आपल्या मुलांनाही हे पदार्थ खाऊ घालू नयेत. अगदी पाच-सहा वर्षे वयाच्या काही मुला-मुलींचे वजन त्यांच्या वयानुसार दीडपट असल्याचेही राष्ट्रीय सर्वेक्षणात आढळून आले आहे. आपले मूल लठ्ठ झाल्याचे मान्य न करता, ते बाळसेदार-गुटगुटीत असल्याचे काही पालक प्रौढी मिरवत सांगतात. प्रत्यक्षात मात्र लठ्ठ मुलांचे हे बाळसे तर नाहीच, पण अल्पवयातच अशा मुलांचे आरोग्य बिघडत असल्याची ती खूण असते. याचा विचार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय पालकही करीत नाहीत. गेल्या पंचवीस वर्षात उपग्रह मनोरंजन वाहिन्यांचा झपाट्याने प्रसार झाला. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, इंटरनेटच्या सुविधा असलेले मोबाईल शालेय मुला-मुलींनाही पालक देत आहेत. परिणामी शाळेतील मुले क्रीडांगणावर फारशी खेळत नाहीत. व्यायामही करीत नाहीत. भारतीय परंपरेनुसार चौरस आहार घेत नाहीत. परिणामी मेदयुक्त पदार्थांच्या अतिखाण्याने त्यांना लठ्ठपणाच्या रोगाने झपाटले आहे. अलीकडे तर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांचे पालक मोटरसायकली, स्कूटर्स हौशेने घेऊन देतात. त्यामुळे त्यांचे चालणेही कमी झाले आहे. शहरी भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खाजगी शिकवण्या, मोबाईलशी तासनतास खेळणे किंवा चॅटिंग करणे, बोलणे या सामाजिक रोगाने पछाडले आहे. परिणामी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आरोग्यही बिघडत आहे. ‘आरोग्यम धन संपदा’ या सुभाषिताची आठवण ठेवून, पालकांनीही जागरूकपणे आपल्या मुलांना चांगल्या सवयी बरोबरच, मोबाईल आणि जंकफूडच्या सामाजिक व्यसनातून सोडवायला हवे. फक्त शाळातच जंकफूडवर बंदी आणल्याने, आरोग्याला ग्रहण लावणारी ही समस्या सुटणारी नाही. पालकांनीही जागरूकपणे या आरोग्य मोहिमेत सहभागी व्हायला हवे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: