Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

इशारे नकोत, कृती हवी
vasudeo kulkarni
Friday, May 12, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: ag1
काश्मीर खोर्‍यातील हिंसाचाराचा आगडोंब रोखून, पुन्हा शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर कारवाई करायलाच हवी, हेच लेफ्टनंट उमर फैयाज यांचा दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूरपणे केेलेल्या खुनाच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. काश्मीर खोर्‍यातील कुलगाम जिल्ह्यातील सरसोना गावचेच रहिवाशी असलेले उमर आपल्या गावापासून तीस किलोमीटर अंतरावरच्या बटापूर गावात मामेबहिणीच्या विवाहासाठी गेले होते. विवाह सोहळ्याची तयारी सुरू असतानाच, त्यांचे मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान सहा सशस्त्र दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केले. या घटनेची माहिती पोलिसांना देऊ नका आणि दिल्यास तुमचाही खातमा करू, अशा धमक्याही या नराधमांनी घरातील लोकांना दिल्या होत्या. दहशतवादी सकाळपर्यंत उमर यांना सोडतील, अशी आशा घरच्यांना होती. पण ती फोल ठरली आणि शोपिया गावाजवळ उमर यांचे पार्थिव पोलिसांना छिन्नभिन्न अवस्थेत सापडले. दहशतवाद्यांनी आठ तास त्यांचा छळ केला. त्यांना प्रचंड मारहाण केली. त्यांचे पाय दहशतवाद्यांनी तोडले होते. त्यांच्या जबड्यात बंदुकीच्या नळ्या कोंबून दातही पाडले होते. अमानुष छळ केल्यावर या नि:शस्त्र, राष्ट्रभक्त शूर युवकावर भ्याड दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यांचा बळी घेतला. भारतीय लष्करात ते भरती झाले आणि अधिकारीही झाले, ते देशसेवा करीत होते, हाच त्यांचा गुन्हा ठरला. काश्मीर खोर्‍यातील केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयात शिकलेल्या उमर यांचे भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पुण्याच्या संरक्षण अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यावर अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच राजपुताना रायफल्सच्या अखनूर विभागातील तुकडीत ते दाखल झाले होते. लष्करी सेवेत त्यांनी आतापर्यंत रजाही घेतली नव्हती. घरच्या लग्नासाठी त्यांनी रजा घेतली आणि नादान दहशतवाद्यांनी अवघ्या 22 वर्षे वयाच्या शूर जवानाचा भ्याडपणे खून केला. दहशतवाद्यांचा त्यांनी प्रतिकारही केला असावा. कारण तशा जखमांच्या खुणा त्यांच्या देहावर आढळून आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. काश्मीर खोर्‍यातील राष्ट्रवादी युवकांचे उमर हे प्रेरणास्थान होते. त्यांच्यामुळेच अनेक युवकांनी लष्करी सेवेत प्रवेश करून, दहशतवाद्यांच्या धमक्यांना आणि कारवायांना चोख प्रत्युत्तरही दिले होते. लष्करी  इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा हजारोंच्या जमावाने त्यांना अखेरची श्रध्दांजली वाहत, दहशतवाद्यांच्या भ्याड आणि माणुसकीचा मुडदा पाडणार्‍या कारवायांचा निषेधही केला. उमर यांची हत्या करणार्‍या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी, अशा भावनाही शोकाकूल जमावाने व्यक्त केल्या. उमर यांच्या अंत्ययात्रेवरही काही कृतघ्नांनी दगडफेकही केल्याने, आपल्याच रक्ताच्या माणसांच्या मृत्यूचेही दहशतवाद्यांच्या साथीदारांना सोयरसुतक राहिले नसल्याचे या घटनेने चव्हाट्यावर आले आहे. उमर यांचा खून करणार्‍या मारेकर्‍यांना धडा शिकवला जाईल, असे राजपुताना रायफल्सचे कर्नल आणि पश्‍चिम कमांडचे कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अभय कृष्णा यांनी सांगितल्यानुसार या मारेकर्‍यांना पकडून फाशीच्या तख्तावर पोहोचवायला हवे. या उमरच्या कुटुंबीयांच्या संतप्त भावना आहेत.     

आता संयम पुरे
दहशतवाद्यांचा म्होरक्या बुर्‍हान वाणीचा सुरक्षा दलांनी चकमकीत मुडदा पाडल्याच्या घटनेनंतर, गेल्या वर्षभरात काश्मीर खोर्‍यात उसळलेला हिंसाचाराचा वणवा शांत झालेला नाही. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या चिथावणीने काश्मीर खोर्‍यातील युवकांनी सुरक्षा दलांच्या तुकड्यांवर तुफान दगडफेकीचे सत्र सुरू ठेवले आहे. गेल्या पंधरा दिवसात शाळा-महाविद्यालयातील मुलीही माथेफिरूपणे सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करीत आहेत. याच पाकिस्तानच्या घुसखोरांच्या टोळ्यांनी 1947 मध्ये काश्मीर खोर्‍यातील वीस हजार स्त्री-पुरुषांची सामूहिक कत्तल केलेली होती. हजारो महिलांवर बलात्कारही केले होते. शेकडो युवतींना पळवूनही नेले होते. पाकिस्तानी लष्कर आणि धर्मांध दहशतवाद्यांच्या तावडीतून तेव्हा भारतीय लष्कराने आपले रक्त सांडून काश्मीरी जनतेचे आणि काश्मीरचे संरक्षण केले होते. पण नव्या पिढीतील काश्मीरी युवकांना आपण त्या सैतानांची साथ देत आहोत, याचे भान नाही. 1990 च्या दशकातही याच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीर खोर्‍यात निरपराध जनतेच्या सामूहिक कत्तली घडवल्या. शेकडो महिलांवर अत्याचार-बलात्कार केले. हे नराधम राक्षसी वृत्तीचे असल्याचा अनुभव आल्यानेच, काश्मीरी जनतेने त्यांना आश्रय देणे बंद करून, शांततेसाठीच्या मोहिमेला कृतीशीलपणे साथ दिली. आता पुन्हा त्याच अत्याचारांची पुनरावृत्ती दहशतवाद्यांनी सुरू केली असतानाही, पाकिस्तानचे हिरवे झेंडे नाचवत, आझादीच्या घोषणा देणार्‍या माथी भडकलेल्या युवकांना, या नादाला लागू नका, तुमचे जीवन उद्ध्वस्त होईल, असे सांगणारे नेतृत्वही काश्मीर खोर्‍यात नाही. फुटिरतावादी हुर्रियत परिषदेच्या नेत्यांचेही युवकांच्या टोळ्यांवर नियंत्रण नाही. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सरकारचे अस्तित्वही काश्मीरमध्ये सध्याच्या अराजकाच्या स्थितीत जाणवत नाही. केंद्र सरकार काश्मीर खोर्‍यात चर्चेद्वारे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी, चर्चा कोणाशी करायची, हाच मूलभूत प्रश्‍न आहे. काश्मीरला स्वातंत्र्य मिळावे, या मागणीसाठी सुरक्षा दलांच्या जवानांवर तुफानी दगडफेक करणार्‍या धर्मांधतेचे भूत डोक्यावर बसलेल्या युवकांना, पाकिस्तानव्याप्त काश्मीरला पाकिस्तान स्वातंत्र्य का देत नाही? असा विचार करावा, असे वाटत नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जनतेवर पाकिस्तानी लष्कराकडून होणार्‍या अत्याचारांच्या विरुध्द, तिथली जनता रस्त्यावर उतरून निर्भयपणे आंदोलन का करत आहे? याचा विचार हे माथेफिरू युवक करीत नाहीत. आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानी लष्कराच्या सहाय्याने काश्मीर खोर्‍यात दहशतवादी घुसवायचा उद्योग सुरुच असताना, केंद्र सरकारने ही घुसखोरी बंद पाडायचे इशारे देण्यापलीकडे काहीही केलेले नाही. पण इराणने मात्र, आपल्या देशात पाकिस्तानने दहशतवादी घुसवायचे उद्योग बंद केले नाहीत तर, युध्दाच्या मार्गाने धडा शिकवायची धमकी दिली आहे. गेल्याच आठवड्यात भारतीय हद्दीत घुसून पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी दोन भारतीय जवानांचे शीर कापून त्यांची विटंबना केल्याची घटना घडली आहे. आता संयमाचा कळस झाला. केंद्र सरकारने लष्कराला काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी पूर्ण मोकळीक देण्याबरोबरच दगडफेक करणार्‍यांचा कठोरपणे बंदोबस्त करायचे आदेशही द्यायला हवेत. त्याशिवाय काश्मीर खोर्‍यातला हिंसाचार थांबणार नाही.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: