Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

जगावर सायबर हल्ला
vasudeo kulkarni
Monday, May 15, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: ag1
संगणकाच्या (कॉम्प्युटर) युगाने दूरसंचार, संपर्क क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती झाली असली तरी, या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून, सार्‍या जगालाही दावणीला बांधता येते, याची प्रचितीच रॅनसमवेअर तंत्रज्ञानाद्वारे 75 देशातील लाखो संगणकावर झालेल्या सायबर हल्ल्याने आली आहे. या आधीही इंटरनेटद्वारे संगणकात व्हायरस सोडून, लाखो कॉम्प्युटर्स मधील महत्त्वाची माहिती नष्ट करायच्या घटना घडलेल्या आहेत. संगणकाच्या यंत्रणेत सोडले गेलेले विविध व्हायरसचा शोध घेऊन ते निकामी करणार्‍या नव्या अँटिव्हायरस (विषाणू प्रतिबंधक) आज्ञाप्रणालींचा शोध संगणक तज्ञांनी लावला. या नव्या आज्ञा प्रणालीच्या सहाय्याने संगणकातील माहिती चोरणे आणि नष्ट करणे शक्य नसल्याचा दावा संगणक तज्ञांनी केला होता. पण, अवघ्या दोनच वर्षांपूर्वी एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची आज्ञा प्रणाली भेदून संगणकावरील अति संवेदनशील माहितीही चोरून, जगात आघाडीवर असलेल्या विविध संगणक प्रणाली तयार करणार्‍या मायक्रोसॉफ्ट कंपनीसह अनेक कंपन्यांना आव्हान दिले होते. आता अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेतील रॅनसमवेअर ही आज्ञा प्रणाली चोरून, वन्नाक्राय या नावाच्या विषाणूद्वारे संगणक आज्ञाप्रणाली (हॅकर्स) चोरट्यांनी अनेक राष्ट्रातील हजारो संगणकावर हल्ला चढवून, या संगणकांची यंत्रणाच पूर्णपणे बंद पाडल्याने, सारे जगही हादरले आहे. बहुतांश संगणकात विषाणूंचा प्रतिबंध करणारी यंत्रणा आणि आज्ञा प्रणाली असतानाही, ती भेदून हा व्यापक जागतिक हल्ला चढवण्यात आला आणि तो यशस्वी झाला, ही बाब जागतिकदृष्ट्याही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. या विषाणूंमुळे इंग्लंडमधील सर्व आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या देशातील रुग्णालयातील संगणक सुरू करताच ‘माय हार्ट सर्जरी वॉज कॅन्सल’, असा संदेश दिसत आहे. रुग्णालयातील संगणक यंत्रणाच बंद पडल्याने इंग्लंडमधील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच विषाणूच्या हल्ल्यामुळे स्पेनमधील दूरसंचार आणि नैसर्गिक वायू यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. पोर्तुगालमधील दूरसंचार व्यवस्था विस्कळीत झाली. जर्मनीतील अनेक संस्थांचे संगणक बंद पडले. अमेरिकेतील फेडेक्स या आंतरराष्ट्रीय कुरिअर संस्थेची संगणक प्रणाली बंद पडली आहे. संगणकातील यंत्रणा या हॅकर्सनी बनावट (स्पॅम) मेलद्वारे चोरल्याचे एव्हास्ट या सायबर सुरक्षा संस्थेचे म्हणणे आहे. आतापर्यंत या संस्थेकडे या हल्ल्याच्या 75 हजार तक्रारी आल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निषेधार्थ ‘द शॅडो ब्रोकर्स’ या हॅकरच्या गटानेच हा व्हायरस अमेरिकन सुरक्षा संस्थेकडूनच चोरून तो गेल्या महिन्यातच सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या विषाणूच्या हल्ल्यामुळे कॉम्प्युटरमधील सर्व यंत्रणा हॅकर्सकडून ताब्यात घेतली जाते. कॉम्प्युटरमधील कोणतीही माहिती (फाईल) उघडता येत नाही. बंद पडलेल्या अशा कॉम्प्युटरमधील माहिती (डेटा) हवा असेल तर, आम्ही सांगू ती रक्कम द्यावी, अशी धमकी दिली जाते. यावेळीही रॅनसमवेअरद्वारे बंद पाडलेल्या कॉम्प्युटर्सच्या कंपन्या, संस्था आणि व्यक्तींकडून प्रत्येकी 300 डॉलर्स मागण्यात येत आहेत. बिटकॉन या चलनाद्वारे ही रक्कम मागितली
जात आहे.

सुरक्षिततेला धोका
सार्‍या जगभर संगणकांचा प्रसार झाला. इंटरनेटद्वारे सारे जग जोडले गेले. नव्या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे स्मार्टफोन सुध्दा संपर्क आणि इंटरनेटद्वारे माहितीच्या आदान-प्रदानाचे साधन झाले. भारतासह सार्‍या जगभरात अब्जावधी लोक स्मार्टफोन आणि संगणकाचा वापर करतात. संगणकाचा वापर हा आधुनिक जगाचा मूलमंत्र झाला आहे. केवळ व्यक्तीगतच नव्हे, तर उद्योग, व्यापार, वाहतूक, रेल्वे, आरोग्य, कृषी, संरक्षण यासह सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर करणे ही सध्याच्या काळाची गरज झाली आहे. अशा स्थितीत व्यक्तिगत आणि सरकारी खात्यांच्या उद्योगांच्या, संस्थांच्या संगणकातील गुप्त माहिती हॅकर्सद्वारे अशी चोरली जाण्याच्या नव्या धोक्यामुळे, जागतिक सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियासारख्या युध्दखोर भस्मासूराच्या हाती हॅकिंगचे हे तंत्रज्ञान गेल्यास, त्याद्वारे जगात विविध क्षेत्रात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. संगणकाचे आणि आज्ञा प्रणाल्यांचे तंत्रज्ञान विकसित झालेल्या अमेरिकेतच संगणकीय व्हायरस आणि हॅकिंगचे तंत्रज्ञान विकसित झाले, ही बाबही लक्षात घ्यायला हवी. माहिती क्षेत्रातील कोणतेही तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आणि अभेद्य असूच शकत नाही, हे नव्या संगणक हल्ल्याने उघड झाले आहे. कालबाह्य झालेली आज्ञा प्रणाली किंवा न वापरलेली नवी आज्ञाप्रणाली वापरायला काढल्यास रॅनसमवेअरद्वारे संगणकावर हल्ला होवू शकतो, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे म्हणणे आहे. जगाच्या दृष्टीने हा अत्यंत धोकादायक असा हल्ला असल्याने सर्वच राष्ट्रांनी सावध रहावे, असे आवाहन स्प्लंक या सुरक्षा आस्थापनाच्या धोका संशोधन संस्थेचे संचालक रिच बार्गर यांनी केले आहे. अमेरिका, रशिया, चीन, जपान, भारत, इंग्लंड, जर्मनी, स्पेन या विकसित राष्ट्रांबरोबरच जगातील विकसनशील राष्ट्रातही संरक्षणासह सरकारी आणि खाजगी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात माहितीची देवघेव इंटरनेटद्वारेच होते. संरक्षण, अर्थ आणि सरकारी क्षेत्रातील विविध खात्यांची गुप्त माहितीही संगणकाच्या हार्ड डिस्कमध्येच साठवून ठेवली जाते. विविध सरकारी खाती टपालाच्या ऐवजी ईमेलद्वारेच परस्परांशी जलदगतीने संपर्क साधतात. इंटरनेट, मोबाईल आणि एस.एम.एस.द्वारे अति जलद गतीने माहितीचे आदानप्रदान करायची नवी यंत्रणा जगाला उपलब्ध झाली. आता तर स्मार्टफोनमुळे छायाचित्रे आणि विविध माहिती पाठवता आणि मिळवता येणे शक्य झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या नवनव्या तंत्रज्ञान आणि शोधांचा फायदा जगालाही झाला. पण, संरक्षण क्षेत्रातील गुप्त माहितीही संगणकातच साठवली जाते. ती चोरली गेल्यास त्याचे   दूरगामी परिणाम जगावरही होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. बँकिंग क्षेत्रही याच तंत्रावर अवलंबून असल्याने हे हॅकर्स जगातील अर्थव्यवस्थेलाही हादरा देवू शकतील, अशी स्थिती आहे. तंत्रज्ञान जितके आधुनिक तितकेच ते चोरायचे तंत्रज्ञानही उपद्व्यापी, दहशतवाद्यांकडे गेल्यास जगही सुरक्षित राहू शकणार नाही, हाच या नव्या सायबर हल्ल्याचा सार्‍या जगाला धडा आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: