Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हंदवाडा येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
ऐक्य समूह
Monday, May 15, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: na3
5 श्रीनगर, दि. 14 (वृत्तसंस्था) : ‘लष्कर-ए-तोयबा’चे दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथील वारिपोरा या गावात ही चकमक झाली.
वारिपोरा गावातील एका घरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी या परिसराला वेढा घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरून दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांचे कोणतेही नुकसान झाले नाही अथवा एकही नागरिक जखमी झाला नाही. 
योग्य खबरदारी घेत ही मोहीम राबवण्यात आली. हे दहशतवादी ‘तोयबा’चे सदस्य असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून ते कोणत्या संघटनेचे सदस्य होते, याचा तपास सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात आणखी शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, तेथे आणखी काही दहशतवादी नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोहीम थांबवण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: