Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करा
ऐक्य समूह
Tuesday, May 16, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: mn1
आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे भारताची मागणी
5 नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे आज केली. कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवत पाकिस्तानने सुनावलेली शिक्षा ही व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद भारताने केला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशी दिली जाऊ शकते, अशी भीतीही भारताच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या याचिकेला विरोध केला आहे. ही याचिका अनावश्यक आणि चुकीच्या गृहितकावर आधारीत असल्याचे म्हणणे पाकिस्तानचे वकील खावर कुरेशी यांनी मांडले. जाधव यांच्या पासपोर्टवर मुस्लीम नाव कसे, याचे स्पष्टीकरण भारताला करता आलेले नाही. कुलभूषण जाधव यांना ‘कॉन्सुलर अ‍ॅक्सेस’चा अधिकार नसून त्यांच्यासंबंधी पाकिस्तानने केलेल्या पत्रव्यवहाराला भारताने कोणतेही उत्तर दिले नाही, असा दावाही त्यांनी केला.
कथित हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर नेदरलँडस्मधील हेग येथे आज सुनावणीझाली. त्यामध्ये ज्येष्ठ विधीष हरिष साळवे यांनी भारताची बाजू मांडली. कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला राजनैतिक दूतावसाद्वारे संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली नाही. याबद्दल 16 वेळा मागणी करूनही पाकिस्तानने भारताला प्रतिसाद दिला नाही. जाधव प्रकरणात पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने निष्पक्षपणे खटला चालवला नाही. हा खटला म्हणजे केवळ ‘फार्स’ होता. या प्रकरणात पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याने भारताला इतक्या कमी वेळात आंतरराष्ट्रीय न्यायालयात यावे लागले, असे साळवे यांनी सांगितले.
ही सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची भीती आहे. पाकने तसे कृत्य केल्यास हा व्हिएन्ना कराराचा भंग ठरेल. जाधव यांना स्वत:ची बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात
आली नाही. त्यांना वकीलही देण्यात आला नाही. त्यांच्याविरुद्ध
एकही पुरावा नसताना त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना
अपिलाची संधीही न देता फाशी दिल्यास ते व्हिएन्ना कराराचे उल्लंघन ठरेल, असा युक्तिवाद भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव दीपक मित्तल यांनी केला.
भारतानंतर पाकिस्ताननेही आपली बाजू मांडली. भारताची याचिका विनाकारण आणि चुकीच्या गृहितकावर आधारीत असल्याचा दावा पाकिस्तानचे वकील खावर कुरेशी यांनी केला. भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा वापर राजकारणासाठी करत असल्याचा दावाही त्यांनी केला. जाधव यांच्या पासपोर्टवर मुस्लीम नाव कसे, याचे कोणतेही स्पष्टीकरण भारताने दिले नाही. जाधव यांच्यावरील आरोपांबाबतही भारताने कोणताही प्रतिसाद दिला नाही. जाधव हे भारतासाठी हेरगिरी करत असल्याने त्यांना ‘कॉन्सुलर अ‍ॅक्सेस’चा कोणताही अधिकार नाही. या न्यायालयाला फौजदारी अपिलावर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. भारताने या याचिकेत व्हिएन्ना कराराच्या 36 व्या परिशिष्टाचा आधार घेतला आहे. मात्र, हा करार दोन मित्र देशांमधील सुसंवादासाठी असून एखाद्या देशाने नेमलेल्या गुप्तहेराच्या प्रकरणात लागू होत नाही, असा युक्तिवाद कुरेशी यांनी केला. यावेळी जाधव यांच्या कथित कबुलीजबाबाचा व्हिडिओ पाकिस्तानने पुरावा म्हणून सादर केला. हा व्हिडिओ पाहण्याची विनंती पाकिस्तानने केली. मात्र, जाधव यांच्याकडून जबरदस्तीने घेतलेल्या कबुलीजबाबाचा हा व्हिडिओ पाहण्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नकार दिल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आजची सुनावणी संपल्याचे जाहीर केले. या संदर्भातील निकालाच्या सुनावणीची तारीख नंतर जाहीर होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: