Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बस्तरमध्ये नक्षली कमांडरचा खात्मा
ऐक्य समूह
Tuesday, May 16, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: mn2
5 रायपूर, दि. 15 (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना बस्तरच्या जंगल भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत रविवारी रात्री नक्षलवाद्यांचा कमांडर विलासचा खात्मा केला, अशी माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली. या नक्षलवाद्यासाठी 16 लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होत.
बस्तर येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी अरिफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास हा कैलाश किंवा ऐतू नावाने ओळखला जात होता. बरगममधील जंगलात त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला मारण्यात आले. विलास हा तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार जवानांचे गट करण्यात आले. यावेळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामध्ये विलासला कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरून एके-47, एक रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली. विलास हा जगदालपूर, दंतेवाडा आणि नारायणपूर या भागातील नक्षलवाद्यांचा प्रमुख होता. बरसूर भाग समितीचा तो सचिव होता. त्याला ठार करण्यात यश आल्याने नक्षलवाद्यांमध्ये भीती पसरली आहे, असे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: