Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यात्रा काळातही जायगाव ग्रामस्थांनी केले श्रमदान
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: re3
5वडूज, दि. 16 : जायगाव, ता. खटाव येथील ग्रामदैवत श्री जानुबाई देवीची यात्रा नुकतीच उत्साहात झाली. मात्र, ग्रामस्थांनी एक दिवस धार्मिक कार्यक्रम व दुसर्‍या दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान या दोन दिवसांचा अपवाद वगळता वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानाचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. या श्रमदानात यात्रेसाठी बाहेरगावाहून आलेल्या चाकरमान्यांबरोबरच मुंबई, पुण्याच्या मोठ्या उद्योग व्यावसायिकांनीही सहभाग घेतल्याने ग्रामस्थांचा उत्साह चांगलाच वाढला आहे.
वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या 36 गावांमध्ये जायगावचा समावेश आहे. या गावच्या सरपंच सुरेखा देशमुख, उपसरपंच दत्तात्रय राऊत, युवा कार्यकर्ते यशवंत देशमुख, विक्रम देशमुख, गोरख पवार, सत्वशिला नलवडे या सहा जणांनी पाणी फौंडेशनचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात येवून त्यांनी ग्रामबैठक घेवून लोकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर या कामात बहुतांशी ग्रामस्थांनी झोकून दिले आहे. दररोज गावातील 500 ते 800 लोक श्रमदानासाठी घराबाहेर पडत आहेत. यामध्ये अबाल वृध्दाबरोबर महिलांचाही मोठा सहभाग आहे. आतापर्यंत गावकर्‍यांनी 11 ओढ्यांचे सुमारे 8 ते 9 कि.मी. लांबीचे खोलीकरण केले आहे. रोकडा तलाव, चार सिमेंट बंधारे, पाच नालाबांध यांची दुरुस्ती केली आहे. 300 शोषखड्डे तयार केले आहेत. 15 हजार घनमीटर समतल चारे काढण्यात आले आहेत. तर अंदाजे 30 हेक्टर क्षेत्रात नालाबांध कंपार्टमेंटची कामे झाली आहेत. पाच लूज बोल्ड पूर्ण झाले असून ती 50 करण्याचा मानस आहे. परिसरातील जोतिबा खोरा, कडूझळा, वागजाई, कोळकी, जानुबाई खुरी या शेत-शिवारात दररोज शेकडो ग्रामस्थांच्या झुंडी दिसत आहेत. कामासंदर्भात लोकांना प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते हायड्रोमार्कच्या सहाय्याने तांत्रिक आखणी करुन देत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: