Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा बँकेला करोत्तर 65 कोटींचा नफा : आ. शिवेंद्रसिंहराजे
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
नोटाबंदीचाही नफ्यावर परिणाम; नोटाबंदी काळातील 100 कोटी रुपये पडून
5 सातारा, दि. 16 :  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निव्वळ 65 कोटी 13 लाख करोत्तर नफा झाला आहे. जिल्ह्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारण चळवळीच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेणार्‍या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि  गावातील यांत्रिक कामासाठी नफ्यातून 25 लाख रुपये निधी उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, नोटाबंदीचाही जिल्हा बँकेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. नोटाबंदीच्या काळातील 100 कोटी रुपये बँकेत पडून आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संचालक आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे,  आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, श्रीमंत दादाराजे खर्डेकर,  राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, प्रकाश बडेकर  उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेतकरी सभासदांसाठी 1 लाखांपर्यंत अल्पमुदत कर्ज हे शून्य टक्के दराने असून 1 लाख ते 3 लाखांपर्यंत कर्ज घेणारे सभासदांकडील विनाथकीत चालू वसूलपात्र रकमेवर आकारले जाणारे 2 टक्के प्रमाणे होणार्‍या व्याजासाठी 2 कोटी इतकी रक्कम बँकेच्या नफ्यातून सभासदांना परत करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्जही शेतकर्‍यांना शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे. सामाजिक भूमिकेतून शेती उत्पादकता वाढ व पाणी बचतीसाठी 10 हजार शेतकरी सभासदांना साखर कारखाना व सोसायटीच्या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी एकरी 45 हजार रुपये कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांना शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम व संस्थेची स्वमालकीची इमारत बांधकाम करण्यासाठी बँकेने दिलेल्या कर्जावर नफ्यातून सवलत दिल्याने गोदाम इमारत बांधकाम कर्ज शून्य टक्के व्याजदारने उपलब्ध झाले आहे. शैक्षणिक कर्जावरील सवलत कालावधीमधील सभासदांनी भरलेल्या व्याजाची 100 टक्के रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केल्याने सवलत कालावधीत शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांना अल्पदराने 4 टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. कर्जदारांसोबत ठेवीदारांनाही विमा संरक्षण दिले जाणार आहे. बँकेच्या सर्व 313 शाखांमधून कोअर बँकिंग प्रणाली प्रस्थापित केली आहे. त्याचप्रमाणे सीटीएस, रुपे, डेबिट कार्ड, केसीसी, एनएफईटी आरटीजीएस, ओपीबीएस, एनएसीएच इत्यादी सुविधा दिल्या आहेत. भ्रमण ध्वनीद्वारे मोफत एसएमएस, खातेदारांस वैकल्पिक नेट बँकिंग, मोफत एटीएम कार्ड आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. 
650 पॉज मशीन, मायक्रो एटीएमद्वारे विकास सेवा संस्थांमार्फत बँकिंग सुविधा गावागावात पोहचवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. सध्या 15 विकास सेवा संस्थांना मायक्रो एटीएम मशीन वितरित केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बँकेने स्वतःची प्रॉडक्टप्लेस.इन ही स्वतंत्र वेबसाईट सुरु केली आहे.
जिल्ह्यातील सर्व विकास सोसायट्या संगणकीकृत करुन कोअर बँकिंग प्रणालीशी जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. ग्रामीण भागात सहकारी संस्थांचे मोठे जाळे असल्याने बँकेने मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा स्वीकारुन नवीन नोटा चलनात आणल्या. मात्र, तत्काळ सरकाराने सहकारी बँकांकडून जुन्या नोटा घेण्यास नियंत्रण आणल्याने कोट्यवधी रुपये बँकांमध्ये पडून आहेत. नोटाबंदीमुळे जिल्हा बँकेला 16.50 कोटी रुपयांचा तोटा झाला. बँकेकडे 100 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. जुन्या नोटा
रिझर्व्ह बँकेने स्वीकाराव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जुन्या नोटांचा भार जिल्हा बँकेवर पडत असून नाबार्ड आणि रिझर्व्हे बँकेने व्याज द्यावे यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. बँकेत औद्योगिक कर्जपुरवठा विभाग कार्यान्वित केला असून लघु, मध्यम स्वरुपाच्या उद्योग व्यवसायांना कर्जपुरवठ्याची मर्यादा 60 लाखांवरुन 3 कोटींपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचेही बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले अशा सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा बँकेत असलेल्या संचालकांवरही कारवाई केलेली आपल्याला दिसेल, असे यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: