Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खासगी सावकारी प्रकरणी खंडू धाराशिवकरला अटक
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: lo2
5 सातारा, दि. 16 ःव्याज आणि दंडापोटी 18 लाख 75 हजार रुपये  वसूल करून पुन्हा 7 लाखाच्या वसुलीसाठी तक्रारदाराच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या प्रमोद उर्फ खंडू बाळासाहेब धाराशिवकर (वय 32, रा. न्यू विकासनगर, खेड, ता. सातारा) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रहिमतपूर फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
सातारा शहरात खाजगी सावकारी बोकाळली असून केवळ तक्रारी अभावी पोलिसांचे हात बांधले जातात आणि पठाणी पध्दतीच्या वसुलीमुळे सातारकरांना ताेंंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो. अशा प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी धडक पावले उचलली आहेत. त्या नुसारच मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अजित महादेव हिरवे (वय 39, व्यवसाय प्रकाशन,  मूळ  रा. शेवरी ता. माण, सध्या रा. यशवंत कॉलनी, गोडोली, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस सुत्र आणि दाखल फिर्यादीनुसार हिरवे यांनी आर्थिक अडचणीमुळे आरोपी धाराशिवकर याच्याकडून 2008-2009 मध्ये 10 टक्के व्याजाने पाच लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याज व दंड असे मिळून आरोपीनी हिरवे यांच्याकडून 18 लाख 75 हजार रुपये वसूल केले. यापोटी हिरवे यांच्या मालकीची इंडिका व फॉर्च्युनर गाडी ओढून नेली. इतके होऊनही मुद्दल व व्याज असे मिळून पुन्हा 7 लाख रुपयांची मागणी केली. व्याजाचे पैसे देत नाही व जप्त केलेली गाडी नावावर करून देत नाही म्हणून धाराशिवकर याने हिरवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. हिरवे यांनी फिर्याद दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सूचनेनुसार गोडोली  परिसरातील रहिमतपूर फाटा परिसरात मंगळवारी सापळा रचून संशयिताला पकडण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विजय शिर्के, दीपक मोरे, प्रवीण शिंदे, विजय कांबळे, संजय जाधव यांनी या कारवाईत भाग घेतला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: