Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चिदम्बरम, लालूप्रसाद यांच्या मालमत्तांवर छापे
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: mn1
सीबीआय, प्राप्तिकर विभाग यांची कारवाई
5 नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : परकीय गुंतवणूक मंडळाकडून आयएनएक्स मीडियाला परकीय गुंतवणुकीसंदर्भात बेकायदेशीर परवानग्या दिल्याच्या आणि परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांच्या चेन्नई व राजनाधी दिल्लीतील निवासस्थानांसह 14 ठिकाणी सीबीआयने आज एकाच वेळी छापे टाकले. त्याच वेळी बेनामी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित लोकांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून तपासणी केली.
दरम्यान, मोदी सरकारने राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप पी. चिदम्बरम यांनी केला आहे तर लालूप्रसाद यांनीही मोदी सरकारने सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले असून ज्या लोकांनी गैरकृत्ये केली आहेत, त्यांना उत्तरदायी ठरवण्याचा आजचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महिनाभरापूर्वीच पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघन प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. चेन्नईस्थित वासन हेल्थ केअर कंपनीच्या शेअर विक्रीमध्ये त्रुटी आढळल्या असून या प्रकरणात 45 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. कार्ती हेच त्याचे मुख्य लाभार्थी आहेत, असे ईडीने म्हटले होते. या शिवाय परदेशी गुंतवणुकीसंदर्भात 2 हजार 262 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी वासन कंपनीचे प्रवर्तक संचालक अरुण, त्यांची पत्नी, सासरे द्वारकानाथन यांनाही नोटीस बजावण्यात आली होती.
त्याचबरोबर शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांची मालकी असलेल्या आयएनएक्स मीडिया प्रा. लि. या प्रसारमाध्यमातील कंपनीने परकीय गुंतवणूक विषयक निकषांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण कार्ती चिदम्बरम यांनी आपले वडील व तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्याशी असलेल्या नात्याचा फायदा घेऊन मिटवले होते, असा आरोप सीबीआयने केला होता. आयएनएक्स आणि चिदम्बरम यांची कंपनी चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखला होता. परकीय गुंतवणूक मंडळाने (एफआयपीबी) केवळ 4.62 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस मान्यता दिली असताना 305 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आणून  कार्ती चिदम्बरम यांनी आयएनएक्स या कंपनीचा खरेदी व्यवहार केला होता, असा आरोपही सीबीआयने केला होता. या कंपनीत आधीच ही गुंतवणूक झाली असताना कार्ती चिदम्बरम यांनी ‘एफआयपीबी’मधील विशिष्ट अधिकार्‍यांना हाताशी धरून या कंपनीस नव्याने गुंतवणूक विषयक मान्यता दिली होती. जी परकीय गुतंवणूक आधीच झाली होती आणि ज्या परकीय गुंतवणुकीची चौकशी होणे अपेक्षित होते, त्या गुंतवणुकीस नव्याने परवानगी देऊन गुन्हेगारी स्वरूपाचा कट तडीस नेण्यात आला होता, असा आरोप सीबीआयने केला होता. या प्रकरणी सीबीआयने आज चौदा ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये पी. चिदम्बरम आणि कार्ती चिदम्बरम यांच्या चेन्नई व नवी दिल्लीतील निवासस्थानांसह त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. पीटर मुखर्जी यांच्या मुंबईतील निवासस्थानीही सीबीआयच्या अधिकार्‍यांनी छापे टाकले.
लालूप्रसाद यांच्याविरुद्ध कारवाई
सीबीआयने चिदम्बरम यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले असताना दुसरीकडे प्राप्तिकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानांवर आणि मालमत्तांवर आजछापे टाकलेे.
लालूप्रसाद केंद्रातील तत्कालनी यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री असताना त्यांची मुलगी खा. मिसा भारती व सध्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले त्यांची दोन मुले तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी तब्बल 1 हजार कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप भाजपचे बिहारमधील नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. या प्रकरणी केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आज या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्याशी संबंधित लोकांच्या 22 ठिकाणांवर आजछापे टाकले. लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या मुलाच्या दिल्ली, गुडगाव, रेवारी येथील मालमत्तांसह 22 ठिकाणच्या मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आणि लालूप्रसाद यांचे विश्‍वासू नेते प्रेमचंद गुप्ता यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले, ते समजू शकले नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: