Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पालकमंत्र्यांनी ठोस काम दाखवावे आणि नंतरच पवारसाहेबांवर बोलावे
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: lo3
5 सातारा, दि. 16 : भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून गेल्या अडीच वर्षात  सातारा जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. निधीची कमतरता असून आणि जिल्ह्याला दोन मंत्री असूनही ते मुख्यमंत्र्यांपुढे भूमिका मांडण्यात कमी पडत आहेत. अनेक योजना बंद आहेत. पालकमंत्र्यांनी अडीच वर्षातील ठोस काम दाखवावे आणि नंतर शरद पवारांवर बोलावे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
माजी केंद्रीयमंत्री खासदार शरद पवार हे जिल्हा दौर्‍यावर आले असताना त्यांनी पालकमंत्र्यांवर टिप्पणी केली होती त्यावरुन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माझे काम बघूनच पवारांना पालकमंत्री कोण हे कळेल, असे वक्तव्य केले होते. जिहे-कटापूरचे काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण करणारच आणि वसना-वांगणाचे काम झाल्याचे सांगितले होते. त्यावर  आ. शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्राची विशेषतः सातारा जिल्ह्याची परिस्थिती वाईट आहे. डीपीसीमध्ये वरकरणी निधी जास्त दिसत असला तरी तो विविध योजनांमधील सरकारचा सहभाग यामुळे दिसत आहे. प्रत्यक्षात अनेक विभागांना निधी नाही तर काही विभागाच्या निधीची तरतूद कमी केली आहे. पालकमंत्र्यांवर विश्‍वास नाही म्हणून सहपालकमंत्री नेमले. परंतु दोघेही मुख्यमंत्र्यांच्या पुढे जिल्ह्याला निधी मिळाला पाहिजे, ही भूमिका मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी भूमिका मांडावी, अशी आमची अपेक्षा असताना उलटपक्षी ते आम्हालाच तुम्ही विधानसभेत तुमची भूमिका मांडा,  असे हतबल होऊन सांगत आहेत हेच त्यांचे अपयश आहे. गेल्या काही वर्षातील निधीची तरतूद आणि या अडीच वर्षातील निधीची तरतूद याबाबत आकडेवारीसह आमची बोलण्याची तयारी आहे. दोन मंत्री असतानाही जिल्ह्याला निधी नाही ही शोकांतिका आहे. जिहे-कटापूरसाठी गेल्या अडीच वर्षात एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही. ते जे निधी दिल्याचे सांगत आहे तो पूर्वीचा निधी असून त्याला सुप्रमा न घेता देत आहेत. सहा महिन्यात पाणी आणणार, असे त्यांनी सांगितले होते. परंतु त्यास आता अडीच वर्षे झाली आहेत. आता डिसेंबर 2017 मध्ये पाणी आणणार, असे ते सांगत आहेत. त्यांनी ते आणले तर चांगलेच आहे. परंतु 2019 पर्यंत हे काम पूर्ण होईल की नाही, अशी शंका आहे. कारण योजना पूर्ण करण्यासाठी 300 कोटी रुपयांची आवश्यकता असून ते कुठून आणणार याबाबत काहीही सांगत नाहीत. वसना-वांगणाचे श्रेय घेण्याचे त्यांनी काहीच कारण नाही. या योजनेच्या अडचणीसाठी लागणार्‍या सर्व बैठका आम्ही घेतल्या. त्यांनी एखादी बैठक घेतल्याचे दाखवावे. सत्ता असो अथवा नसो शरद पवार, अजित पवार यांनी जिल्ह्यावर प्रेम केले आहे. त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही मोठे व्हाल. परंतु गेल्या अडीच वर्षात कोणतेही ठोस काम पालकमंत्र्यांनी दाखवावे आणि नंतर नेत्यांवर बोलावे, नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावण्यापेक्षा त्यातून बोध घेऊन काम करावे. तुम्ही जिल्ह्यात अल्पमतात असतानाही राष्ट्रवादीचे सर्वजण सहकार्य करत आहेत. नेहमी चांगले काम करणार्‍यांना जिल्ह्याने पाठिंबा दिला आहे. जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात असताना तुमचे पक्षप्रमुख हा भ्रष्टाचार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काम करताना त्याला राजकारणाची जोड न दिल्यास आम्ही पाठीशी राहू, असेही त्यांनी सांगितले.
डीपीसीच्या बैठकीत मंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्‍वासन देतात. परंतु आजपर्यंत एकदाही बैठक घेतली नाही. त्यामुळे आश्‍वासनापेक्षा काम करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. थकित कृषी पंप वीज कनेक्शनसाठी लवकरच आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: