खूशखबर! मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधी येणार
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:12 AM (IST)
महाराष्ट्रात वेळेवर दाखल होण्याची शक्यता
5 पुणे, दि. 16 (प्रतिनिधी) : वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या लोकांसाठी आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांसाठी गुड न्यूज आहे. 14 मे रोजी अंदमानात हजेरी लावणारा मान्सून यंदा दोन दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी केरळात दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.
सामान्यपणे मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी त्याचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र, यंदा वेळेत दाखल होणार असल्याची चिन्हे आहेत. अंदमानात एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात पाऊस वेळेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी-पेक्षा यावर्षी जास्त पावसाची अपेक्षा असून सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे शेतकर्यां-साठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: 1 जूनला केरळात येतो. त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होऊन 7 दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होतो. भारतीय हवामान विभा-गाच्या अभ्यासानुसार 96 ते 104 टक्के पाऊस म्हणजे सरासरी, 96 टक्क्यांहून कमी म्हणजे सरासरीहून कमी आणि 90 टक्क्यांहून कमी म्हणजे अपुरा, अशी पावसाची नोंद केली जाते. यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज आहे. मात्र, देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या पहिल्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. याबरोबरच एल निनोचा प्रभाव कमी असल्याने पाऊस चांगला पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान-निकोबार बेटांवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.