Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘त्रिवार तलाक’ची प्रथा 1400 वर्षे जुनी
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: na1
अयोध्येप्रमाणे धार्मिक श्रद्धेचा भाग : एआयएमपीएलबी
5 नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : ‘त्रिवार तलाक’ची प्रथा मुस्लीम समुदायात 1400 वर्षे जुनी असून हा मुद्दा मुस्लिमांच्या श्रद्धेशी जोडला गेला आहे, अशी बूमिका ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. ही प्रथा कैक शतके जुनी असल्याने ती इस्लामविरोधी आणि घटनाबाह्य आहे, असे केंद्र सरकार कसे काय म्हणू शकते, असा सवाल एआयएमपीएलबीच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला, अशी माझी श्रद्धा असेल तर ‘त्रिवार तलाक’ ही प्रथा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे संविधानिक नैतिकतेचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे सिब्बल म्हणाले.
‘त्रिवार तलाक’च्या मुद्द्यावर सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू असून सिब्बल यांनी एआयएमपीएलबीची बाजू मांडली. इस्लाममध्ये ‘ई-तलाक’ आणि व्हॉटस्अ‍ॅपद्वारे दिलेल्या ‘तलाक’ची जागा काय आहे, असा सवाल घटनापीठाने ‘एआयएमपीएलबी’ला केला. त्यावर ‘त्रिवार तलाक’ ही प्रथा इसवी सन 637 पासूनची म्हणजेच 1400 वर्षे जुनी आहे. हा धार्मिक श्रद्धेचाभाग आहे. त्यामुळे ही प्रथा असंविधानिक कशी काय ठरवता येणार, असा सवाल सिब्बल यांनी केल. यावेळी एआयएमपीएलबीने ‘त्रिवार तलाक’चा संबंध हिंदूंच्या भगवान रामाच्या जन्मभूमीबद्दलच्या श्रद्धेशी जोडला. माझी भगवान रामाचा जन्म अयोध्येत जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण श्रद्धेशी संबंधित आहे. येथे संविधानिक नैतिकतेचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
मुस्लीम विवाह हा दोन सज्ञानांनी परस्परसंमतीने ‘निकाहनामा’द्वारे केलेला करार असून त्याचप्रमाणे घटस्फोट हादेखील करारच आहे.  जर निकाह आणि तलाक हे करार असतील तर इतरांना त्याची समस्या का असावी, असा सवाल सिब्बल यांनी केला. ‘त्रिवार तलाक’चा उल्लेख ‘हदित’मध्येही असून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यानंतर ही प्रथा अस्तित्वात आली, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘त्रिवार तलाक’वर अवैध ठरवल्यास केंद्र सरकार मुस्लीम विवाह आणि घटस्फोटांचे नियमन करणारा कायदा आणेल, असे असे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्यावरही सिब्बल यांनी एआयएमपीएलबीची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने ‘त्रिवार तलाक’ची प्रथा अवैध व घटनाबाह्य ठरवली आणि नंतर संसदेनेही कायदा करण्यास नकार दिला तर काय घडेल, असा सवाल सिब्बल यांनी केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा आजचा चौथा दिवस होता. या घटनापीठात शीख, हिंदू, पारशी, ख्रिश्‍चन आणि मुस्लीम, अशा पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश आहे. सरन्यायाधीश खेहर यांच्यासह न्या. रोहिंटन एफ. नरिमन, न्या. उदय उमेश लळित, न्या. जोसेफ कुरियन व न्या. अब्दुल नझीर हेदेखील या घटनापीठाचे सदस्य आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: