Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दै. ऐक्यचे वासुदेव कुलकर्णी यांना दर्पण पुरस्कार जाहीर
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: re2
वाईच्या दत्ता मर्ढेकर यांचाही समावेश
5पोंभुर्ले, दि. 17 : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय रौप्यमहोत्सवी ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा बुधवारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केली.
पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे-देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 171 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याचा विशेष कार्यक्रम पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगड तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री आडिवरेकर होत्या. यावेळी व्यासपीठावर रवींद्र बेडकिहाळ, पंचायत समिती उपसभापती संजय देवरुखकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप नारकर, शिवसेनेचे देवगड तालुका प्रमुख अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादिक डोंगरकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेतर्फे गेली 24 वर्षे राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना ‘दर्पण’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. तसेच राज्यातील विभागवार सहा पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेेखनीय कार्याबद्दल ‘दर्पण’ पुरस्कार देण्यात येतात. राज्यातील एका पत्रकार साहित्यिकास बृहन्महाराष्ट्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कारही देण्यात येतो. विशेष म्हणजे यंदाचे पुरस्काराचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
प्रखर पत्रकारितेचा वारसा
गेले 45 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणार्‍या वासुदेव कुलकर्णी यांनी कोल्हापूरच्या दैनिक नवसंदेशमध्ये बातमीदार म्हणून काही काळ काम केले. त्या नंतर पुण्याच्या दै. केसरीचे ते जिल्हा प्रतिनिधी आणि नंतरच्या काळात विभागीय प्रतिनिधी होते. सांगली येथून प्रसिध्द होणार्‍या दक्षिण महाराष्ट्र केसरीचे ते 18 वर्षे कार्यकारी संपादक होते. 1985 ते 2000 या काळात केसरी वृत्तसमूहाचे ते दिल्लीचे प्रतिनिधी होते. गेली 14 वर्षे ते  दै. ऐक्यचे कार्यकारी संपादक आहेत. केसरीचे संपादक जयंतराव टिळक, चंद्रकांत घोरपडे आणि अरविंद गोखले यांचे मार्गदर्शन त्यांना प्रदीर्घकाळ मिळाले आहे. लोकमान्य टिळक यांच्याप्रखर पत्रकारितेचा वारसा  त्यांनी निर्भिडपणे  पुढे चालवला आहे रोखठोक आणि निर्भय पत्रकारिता करणार्‍या कुलकर्णी यांचा दै. ऐक्यचे संस्थापक-संपादक सुरेश पळणिटकर व शरद पळणिटकर यांच्याशी निकटचा स्नेह होता. दै. ऐक्यच्या प्रारंभीच्या काळात ते ऐक्यचे कोल्हापूरचे बातमीदारही होते. मराठी, राज्यशास्त्र आणि इतिहास आणि समाजशास्त्र विषयातील एम.ए.च्या पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत.
आज जाहीर झालेले अन्य दर्पण पुरस्कार
ज्येष्ठ संपादक पुरस्कार- वासुदेव भगवान कुलकर्णी (कार्यकारी संपादक, दैनिक ऐक्य, सातारा), ‘दर्पण’ पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग- हरिष पाटणे (सातारा जिल्हा प्रमुख, दैनिक पुढारी, सातारा), कोकण विभाग- उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (संपादक साप्ताहिक कडेलोट, प्रतिनिधी दैनिक सामना, सावंतवाडी), उत्तर महाराष्ट्र विभाग- अनंत साहेबराव पाटील (कार्यकारी संपादक)- दैनिक सार्वमत, अहमदनगर), मराठवाडा विभाग- प्रद्युम्न प्रकाशराव गिरीकर (हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, दैनिक एकमत, हिंगोली), विदर्भ विभाग प्रशांत मधुकर देशमुख (विशेष प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ता, वर्धा), बृहन्महाराष्ट्र विभाग- भालचंद्र शिंदे (संपादक, माझी मराठी, कलबुर्गी, जि. गुलबर्गा), पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार- डॉ. जगदीश माधवराव कदम (ज्येष्ठ साहित्यिक, रुई, जि. नांदेड), ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस पत्रकारिता ‘दर्पण’ पुरस्कार- संतोष धोंडू पवार (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, माथेरान, जि. रायगड). विशेष दर्पण पुरस्कार- दत्ता मर्ढेकर (ज्येष्ठ पत्रकार, वाई), भाऊसाहेब कदम (संस्थापक, दैनिक सिंधुदुर्ग समाचार, कोल्हापूर).  दर्पण पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट सी.डी., शाल, श्रीफळ असे आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिन, दि. 6 जानेवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे.
पोंभुर्लेच्या विकासासाठी कटिबद्ध
दरम्यान, बाळशास्त्रींनी दर्पणच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला. ते देवगड तालुक्याचे भूमिपुत्र असल्याचा देवगडवासियांना अभिमान आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून पोंभुर्लेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपदान पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री आडीवरेकर यांनी केले.  जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांच्या नावामुळे पोंभुर्लेच्या विकासासाठी अडचण येऊ शकत नाही. ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्नशील राहावे त्यांना आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले पोंभुर्लेची तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळख आहे. विकासासाठी ग्रामस्थांनी सकारात्मक विचाराने एकत्र यावे. भौगोलिक परिस्थितीमुळे काही अडचणी येत असल्यातरी विकास कामांसाठी प्रशासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी उपसभापती संजय देवरुखकर, सरपंच सादिक डोंगरकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद करंदीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार बाजीराव जांभेकर यांनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: