Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मान्सूनचे आगमन 1 जूनच्या आसपास
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: mn2
5 पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी पावसाचे नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या व उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात मंगळवारी झालेले आगमन बुधवारीही कायम होते. दरम्यान, यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन नियमित वेळेच्या दोन दिवस अगोदर म्हणजे 30 मे रोजी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
सर्वसाधारणत: 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये येतो; परंतु गतवर्षी त्याचे केरळमध्ये सात दिवस उशिरा आगमन झाले होते. यंदा मात्र मान्सूनच्या आगमनाची तारीख 1 जूनच्याच जवळची असेल, असा दिलासा निर्माण झाला आहे. 
‘आयएमडी’ने 2005 पासून मान्सून केरळमध्ये येण्याच्या तारखेचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. हवामानविषयक विविध घटक लक्षात घेऊन हा अंदाज दिला जातो. त्यानुसार या वर्षी ही तारीख 30 मे असण्याची शक्यता आहे. अंदाजासाठी वापरलेल्या प्रारूपांचा विचार करता यात चार दिवस अलीकडे किंवा पलीकडे होऊ शकतात. सध्या नैऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांच्या उर्वरित भागात मान्सूनने मार्गक्रमण केले असून त्याच्या पुढच्या प्रवासासाठीही परिस्थिती अनुकूल आहे.
दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा तीन दिवस आधीच दक्षिण अंदमान समुद्र व निकोबार बेटांवर येऊन पोहोचला. असे झाल्यावर केरळात आणि महाराष्ट्रातही मान्सूनचे लवकर आगमन होणार का, हा नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो; परंतु मान्सून अंदमानात येण्याची तारीख आणि पुढे तो केरळमध्ये येण्याच्या तारखेचा थेट संबंध नसतो. मान्सून लवकर किंवा उशिरा येण्याचा आणि पाऊस कमी-जास्त पडण्याचाही संबंध नसतो. मान्सून एकदा केरळमध्ये आला की, देशातील त्याच्या पुढच्या प्रवासाविषयीचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे वर्तवता येतो, असे हवामानतज्ज्ञ सांगतात. मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख सर्वसाधारणपणे 1 जून असली तरी प्रत्यक्षात दरवर्षी तो 1 जूनलाच येतो असे नाही. 2012 मध्ये ‘आयएमडी’ने 1 जून रोजी मान्सून येणार, असा अंदाज वर्तवण्यातला होता; परंतु प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये 5 जून रोजी आला होता. त्यानंतर 2013 मध्ये 3 जूनऐवजी 1 जूनला आला, 2014 मध्ये 5 जूनऐवजी 6 जूनला आला. 2015 मध्ये 30 मेऐवजी 5 जूनला तर 2016 7 जूनऐवजी 8जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: