Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बाराशे रुपयांची लाच घेताना तलाठी कोळीला रंगेहाथ पकडले
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: re3
आंबवडे येथील फेरफार नोंदीसाठी घेतली लाच
5कराड, दि.17 : आंबवडे, ता. कराड येथील जमिनीच्या नोटीस ऑफ लिज पेंडसी दस्ताची फेरफारला नोंद घेवून तसा फेरफार उतारा देण्यासाठी 2000 रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती 1200 रुपयांची लाच घेताना कोळे, ता. कराड येथे तलाठी पंढरीनाथ विठोबा कोळी (वय 55 वर्षे) रा. अजिंठा पोल्ट्री शेजारी, मळाईनगर, मलकापूर यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदारांचे वडील व चुलते हे सैन्य दलात होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांना 1963 मध्ये शासनाच्या वन विभागाकडून मौजे आंबवडे येथील सर्व्हे नंबर 44 मधील गट नंबर 269 अ/ब/क मधील 8 एकर 24 गुंठे जमीन मिळालेली होती. ती जमीन सध्या तक्रारदार, त्यांची आई व त्यांचे चुलते यांच्या नावावर असून त्यामध्ये लगतचे जमीन मालक यांच्यामध्ये हद्दीच्या कारणावरुन वाद सुरू आहेत. त्या संदर्भांत कराड येथील दिवाणी न्यायालयात रे.दि.मु.नंबर 185/2017 अन्वये दावा दाखल आहे. तक्रारदारांनी त्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक कराड 2 यांच्याकडे सदर जमिनीचे हस्तांतर होवू नये म्हणून दस्त क्र. 1798/2017 अन्वये नोटीस ऑफ लिज पेंडन्सी दस्त केला. त्यांची फेरफारला नोंद घेवून तसा फेरफार उतारा देण्यासाठी कोळे सजाचे तलाठी पंढरीनाथ विठोबा कोळी यांनी 2 हजाराची लाच मागणी केल्याबाबतच लेखी तक्रारी अर्ज दि. 15 मे 2017 रोजी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता.
तक्रारी अर्जानुसार दि. 17 मे रोजी सातारालाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. जमिनीच्या नोटीस ऑफ लिज पेंडन्सी दस्ताची फेरफारला नोंद घेवून तसा फेरफार उतारा देण्यासाठी 2000 रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती 1200 रुपयांची लाच घेताना कोळे, ता. कराड येथील महाराजा आईस्क्रीम पार्लर या दुकानासमोर तलाठी कोळी याला  सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तलाठी कोळी यांच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, हवालदार आनंदराव सपकाळ, पोलीस कर्मचारी अजित कर्णे, प्रशांत ताटे व महिला पोलीस नाईक कुंभार यांनी केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: