Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण जाधव प्रकरणी ‘आयसीजे’चा आज निकाल
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: na1
दुपारी साडेतीन वाजता निकाल जाहीर होणार
5 नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : कथित हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत भारताने केलेल्या याचिकेवर आंतरराष्ट्रीय न्यायालय उद्या (गुरुवार) दुपारी 3.30 वाजता निकाल देणार आहे. जाधव यांची शिक्षा तत्काळ रद्द करण्याची मागणी भारताने केली आहे. त्यावर हे न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सोमवारी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा युक्तिवाद ऐकूनघेतला होता. त्यानंतर या प्रकरणी लवकरात लवकर निकाल देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
कथित हेरगिरी प्रकरणी भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. नेदरलँडस्मधील हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात 11 न्यायाधीशांच्या पीठासमोर सोमवारी भारताच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. जाधव यांचे गेल्या वर्षी 3 मार्चला इराणमधून अपहरण करून त्यांना हेरगिरी व विध्वंसक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला होता, असा दावा भारताने न्यायालयात केला होता. भारताच्या याचिकेवर न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती भारताने सोळा वेळा केली होती.
मात्र, ही विनंती पाकिस्तानने फेटाळली होती. जाधव यांना आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही किंवा त्यांना वकीलही देण्यात आला नव्हता. हा खटला म्हणजे केवळ ‘फार्स’ होता. त्यामुळे व्हिएन्ना करारातील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. पाकने मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा युक्तिवाद साळवे यांनी केला होता.
पाकिस्तानने भारताचा दावा फेटाळून लावला होता. जाधव यांना इराणमधून नव्हे तर बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. जाधव हे हेरच असून आम्ही विचारलेल्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे भारताला देता आली नाहीत. जाधव यांच्या पासपोर्टवर मुस्लीम नाव कसे, याचे स्पष्टीकरणही भारताला देता आले नव्हते. त्याचबरोबर व्हिएन्ना करारातील तरतुदी हेरांसाठी लागू नाहीत, असे पाकिस्ताने म्हटले होते. या सुनावणी दरम्यान जाधव यांच्या कथित कबुलीजबाबाची चित्रफित दाखवण्याची परवानगी पाकिस्तानने मागितली होती. मात्र, त्यास न्यायालयाने नकार दिल्याने पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने लवकरात लवकर निकाल देऊ, असे सांगितले होते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालय भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी साडेतीन आपला वाजता निकाल देणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: