Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पवनचक्कीच्या तांब्याच्या तारा चोरणारी सहा जणांची टोळी तडीपार
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: lo4
5 सातारा, दि. 17 : पाटण व उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या पवनउर्जा प्रकल्पातील चालू पवनचक्की बदं पाडून त्यावरील तांब्याची तार चोरणार्‍या सहा जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी तडीपार केले आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरवणार्‍या आणि समाजात दारु, मटका चालवून बेकायदेशीर कारवाया करणार्‍या टोळ्यांच्या विरोधात तडीपारीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
तडीपार केलेल्या संशयितांची नानासाहेब पांडुरंग मोरे (वय 41, रा. मराठवाडी, ता. पाटण), सुरेश काशिनाथ विभूते (वय 29, रा. पाटण), सागर बबन साळुंखे (वय 29, रा. पाटण), बाबासाहेब बबन पवार (वय 36, रा. पाटण), धोंडिराम जोतीराम यादव (वय 36, रा. मराठवाडी, ता. पाटण), संतोष नथुराम यादव (वय 27, रा. मराठवाडी, ता. पाटण) अशी नावे आहेत.
ही टोळी पाटण वउंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍या करत होती. त्याबाबत त्यांच्यावर आठ गुन्हे दाखलआहेत. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करुन व गुन्ह्यात अटक करुन आणि वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुधारणेची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून पाटण व कराड तालुक्यात कोणतीही हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठीआणि जिल्ह्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये या सहा जणांना सहा महिने कालावधीसाठी तडीपार केले आहे. आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत त्यांनी सातारा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर गेले पाहिजे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: