Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

सरकारी बडवे
vasudeo kulkarni
Thursday, May 18, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: ag1
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वारकरी आणि मराठी जनतेचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीतील विठूरायाची, बडव्यांच्या तावडीतून सुटका झाली असली तरी, आता सरकारने नेमलेल्या नव्या पुजार्‍यांच्या बडवेगिरीच्या छळाने भक्त मंडळी हैराण झाली आहेत. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना या मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोडायला, तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस-पोलीस अधिकार्‍यांनी नकार दिला. अति महत्त्वाच्या व्यक्तींनाच म्हणजेच फक्त सरकारी मंत्र्या-संत्र्यांना या दरवाजातून प्रवेश द्यायचा नियम असल्याचे, तेव्हा त्या प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी असलेल्या हेकट आणि उर्मट-मग्रूर पोलिसांचे म्हणणे होते. 93 वर्षे वयाच्या, राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण सन्मानाने गौरवलेल्या बाबासाहेब हे अति महत्त्वाची व्यक्ती असल्याचे मान्य करायला या मस्तवाल पोलिसांची तयारी नव्हती. शेवटी रणरणत्या उन्हात 20 मिनिटे वाट पाहून बाबासाहेबांनी श्री विठ्ठलाला मंदिरा बाहेरूनच मनोमन नमस्कार केला व ते पुण्याला परतले. बाबासाहेबांना दिलेल्या या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ विठ्ठल मंदिराच्या परिसरातील व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून, या मोकाट सुटलेल्या पोलिसांना आवरा, अशी मागणी प्रशासनाकडे केली. पण, या घटनेची सध्या व्यवस्थापन पाहणार्‍या पंढरपूर प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने गंभीर नोंद घेतली नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सरकारने याबाबत काही कडक कारवाई केली नाही. परिणामी या मंदिरातील परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी आणि सरकारच्या हंगामी समितीने नेमलेल्या पुजार्‍यांना, हे मंदिर आपल्या बापजाद्यांच्या मालकीचेच असल्याचा समज झाला असावा, अशी अत्यंत संतापजनक घटना दोनच दिवसांपूर्वी श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोरच घडली. लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या दत्तात्रय सुसे यांनी श्री विठ्ठलमूर्तीच्या गळ्यात हार घातल्याने, संतापाने बेभान झालेल्या भणगे नावाच्या पगारी पुजार्‍याने त्यांच्या श्रीमुखात हाणली. विठ्ठलाला परस्पर पुष्पहार घालायचा अधिकार कोणत्याही भक्तांना नाही, तो फक्त विठ्ठलाच्या पूजेच्या नावाखाली भक्तांचा छळ करायला सोकावलेल्या पूर्वीच्या बडव्यांची परंपरा चालवणार्‍या पुजार्‍यांचाच आहे, असे मंदिर समितीच्या मस्तवाल पुजार्‍यांना वाटत असावे. भक्ताच्या अंगावर हात टाकायचा माजुर्डेपणा करणार्‍या या पुजार्‍यावर मंदिर समितीने काहीही कारवाई केलेली नाही. तर, सुसे यांनी या घटनेबाबत पंढरपूर पोलीस ठाण्यात आपल्याला मंदिरात पुजार्‍याकडून मारहाण झाल्याची फिर्याद दाखल केल्यावर, पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल न घेता, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. मंदिराच्या आवारात आणि खुद्द विठ्ठलाच्या मूर्तीसमोर पुजारी भक्ताला मारहाण करतो, ही बाब पंढरपूरातील पोलीस खात्याला गंभीर गुन्हा वाटत नाही, ही चिंतेची बाब होय. या मंदिर समितीवर आणि पंढरपूरातील पोलिसांवर सरकारची काहीही जरब, वचक नसल्यानेच या असल्या निंद्य घटना घडत आहेत. ही सरकारी बडवेगिरी प्रशासनाने आणि सरकारने कठोरपणे मोडून काढली नाही तर, संतप्त वारकरीच या नाठाळांच्या माथी काठी हाणल्याशिवाय राहणार नाहीत, याचे भान सरकारने ठेवायला हवे.

सरकारची अनास्था
श्री विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली तरीही, श्री विठ्ठलाच्या पूजेचे अधिकार मात्र, बडव्यांनी सुरु ठेवलेल्या न्यायालयीन लढाईने समितीच्या अधिकारात आले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने श्री विठ्ठलाच्या पूजा अर्चेचे पारंपरिक अधिकार नष्ट झाले आणि हे अधिकारही समितीकडे आले. या आधीच्या अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखालच्या मंदिर व्यवस्थापन समितीने धाडसी पाऊल उचलत श्री विठ्ठलाच्या फक्त ब्राह्मण पुजार्‍यांचा सेवा-पूजेचा अधिकारही संपवला. शास्त्रानुसार पारंपरिक पूजा, मंत्र, आरत्या करता येणार्‍या अन्य जातीतील पुरुषासह महिला पुजार्‍यांच्याही श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी नेमणुका केल्या. या समितीची मुदत संपल्यावर मात्र फडणवीस सरकारने नवी समिती नेमली नाही. विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापन वार्‍यावर सोडत हंगामी समिती स्थापन केली. परिणामी मंदिराची शिस्त बिघडली. कर्मचारी आणि पुजारी, पोलिसांवर समितीची जरब राहिली नाही. विठ्ठलमंदिराच्या शिस्तबध्द कारभारात गोंधळासारखी स्थिती निर्माण झाली. परिणामी मुंबई उच्च न्यायालयानेच आता 30 जून पूर्वी श्री विठ्ठल मंदिर समिती सरकारने नेमावी असे आदेश दिले आहेत. सध्या हंगामी समिती अस्तित्वात असली तरी कर्मचारी समितीच्या अधिकार्‍यांचे आदेश जुमानित नसल्याचेच बाबासाहेब पुरंदरे यांना पोलिसांनी दिलेल्या गैर वर्तणुकीमुळे चव्हाट्यावर आले. तर भक्तालाच मारहाण झाल्याच्या घटनेने सरकारने नेमलेले पुजारीही नवे बडवेच होत असल्याचे उघड झाले आहे. सरकारने मंदिरासाठी नवी व्यवस्थापन समिती नेमताना, राजकारण्यांची वर्णी त्या पदाधिकार्‍यावर लावण्यापेक्षा वारकरी, भक्त आणि सामान्य जनतेच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवायचा अनुभव असलेल्या प्रशासनातील माजी अधिकार्‍यांच्या नेमणुकीचा विचार करायला हवा. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरी नगरीत विठू- रायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो वारकर्‍यांचा मेळा जमतो. त्यांच्याशी असे उध्दट वर्तन पुजारी आणि पोलिसांनी केल्यास, असंतोषाचा स्फोट होईल आणि संतप्त वारकरी या असल्या माजलेल्या पुजार्‍यांना नक्कीच आपल्या हातातील टाळांचा प्रसादही देतील. पोलिसांनीही आपण जनतेचे सेवक आहोत, मालक नाहीत, याचे भान ठेवायला हवे. खाकी वर्दी अंगावर चढताच मस्तवालपणे वागणार्‍या पोलिसांना पंढरपूरातून हाकलून लावायला हवे. त्यांची या पवित्र तीर्थक्षेत्रात काहीही गरज नाही. पुजार्‍यांनाही भक्ताशी सौजन्याने वागायचे शिकवायला हवे. भक्ताशी गैरवर्तन करणार्‍या पुजार्‍याला घरचा रस्ता दाखवायला हवा. विठ्ठलाचे दर्शन सर्व जातीतील भक्तांसाठी खुले व्हावे, या मागणीसाठी साने गुरुजींनी पंढरपूरात उपोषण केले होते, तसे व्यापक अहिंसक आंदोलन न्यायासाठी विठूरायाच्या भक्तांना करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराबरोबरच सरकारच्या ताब्यात असलेल्या, सरकारतर्फे नेमल्या जाणार्‍या व्यवस्थापन समित्याद्वारे अन्य मंदिरातील बडवेगिरी आणि दादागिरी कठोरपणे संपवायला हवी, हाच विठ्ठल मंदिरात भक्ताला झालेल्या मारहाणीचा
धडा आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: