Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:05 AM (IST)
Tags: mn1
सुकमा हल्ल्याचा सीआरपीएफकडून बदला
5 रायपूर, दि. 17 (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील जंगल प्रदेशात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने बुधवारी दिली. सुकमा जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 26 जवान शहीद झाले होते. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना ठार करून त्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. नक्षलवाद्यांशी झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये विशेष कृती दलाचा (एसटीएफ) एक जवान शहीद झाला तर दोन पोलीस जखमी झाले आहेत.
दरम्यान, या कारवाईनंतर एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. या कारवाईत सहभागी असलेले जवान आणि स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 20 नक्षलवादी ठार झाले असावेत, असा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा कमांडो, स्पेशल टास्क फोर्स व जिल्हा राखीव गटाच्या सुमारे 300 जवानांनी बिजापूर जिल्ह्यातील बसगुडा आणि अवापल्ली भागात नक्षलवाद्यांविरुद्ध दि. 12 ते 16 मे या दरम्यान मोहीम राबवली, अशी माहिती सीआरपीएफचे विशेष पोलीस महासंचालक (मध्य विभाग) कुलदीपसिंग यांनी दिली.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक (दंतेवाडा विभाग) सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल टास्क फोर्स, जिल्हा राखीव गट, जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफच्या ‘कोब्रा’ कमांडोंनी बसगुडा व अवापल्ली येथे रविवारी नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. या चकमकीत काही नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यातील पहिली चकमक सकाळीझाली तर दुसरी चकमक सायंकाळी उशिरा झाली. सकाळी झालेल्या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले तर सायंकाळी झालेल्या चकमकीत ‘एसटीएफ’चा एक जवान शहीद झाला.
या मोहिमे दरम्यान मंगळवारपर्यंत काही ठिकाणी नक्षलवाद्यांबरोबर चकमकी झाल्या. 
त्यामध्ये 15 ते 20 नक्षलवादी ठार झाल्याची माहितीही सुंदरराज यांनी दिली. या कारवाईनंतर एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह किंवा शस्त्रे सापडली नसली तरी कारवाईत सहभागी झालेले जवान आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठार झालेल्या नक्षलवाद्यांबाबत अंदाज व्यक्त केला असल्याचे सुंदरराज म्हणाले. सुकमा जिल्ह्यात दि. 24 एप्रिल रोजी सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जवान शहीद झाले होते. त्यानंतर बसगुडा आणि अवापल्ली भागात काही नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुकमा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यातील काही नक्षलवादीही या कारवाईत मारले गेल्याचे सांगण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दक्षिण बस्तर भागात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणार्‍या नद्या आणि दाट जंगलामुळे या भागात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवणे कठीण होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या भागात मोहीम राबवण्यात येत आहे. हा भाग सुकमा आणि बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
दरम्यान, 24 एप्रिल रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या काही नक्षलवाद्यांची छायाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्ध केली असून त्यांची माहिती देणार्‍यास बक्षीस देण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: