Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा फक्त प्रशासकीय सोपस्कारासाठीच...
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: lo2
5 सातारा, दि. 18 : फक्त प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यापुरता आणि त्यानिमित्त सातारा जिल्ह्याचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी त्यांचा दौरा निमित्त ठरला. या दौर्‍यातून भाजपच्या हाती काहीच लागणार नाही, असेच एकूण चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी हार, तुरे तर स्वीकारलेच नाहीत. पण भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी ताटकळलेल्यांना प्रवेशही दिला नाही. निवेदन स्वीकारण्याचीही तयारी त्यांनी दाखवली नाही. सातारा जिल्ह्याच्या भाजपसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा फारसा फलदायी ठरेल, असे चित्र कोठेही पहायला मिळाले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर थेट ते व्हीआयपी सूटमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहात आणि बाहेर थांबले होते.  मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते पुष्पगुच्छ, हार घेवून आले होते. 
मात्र मुख्यमंत्र्यांनी हार, तुरे स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्री थांबलेल्या दालनात गेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी एकूण आढावा बैठकीत काय बोलायचे या विषयावर चर्चा केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेले कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत उभे होते. काही जण पक्ष प्रवेशासाठी आले होते.  त्यांच्यासाठी पक्षाने चिन्हाची उपरणी आणून ठेवली होती. मुख्यमंत्री बाहेर आले, की पुष्पगुच्छ देवून आणिउपरणे घालून तुमचा प्रवेश घडवतो, असे त्यांना सांगण्यात येत होते. एकूणच सर्वजण चातकासारखी मुख्यमंत्र्यांची वाट बघत थांबले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि आमदार शंभूराज देसाई बाहेर आले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आपले जॅकेटही इस्त्री करण्यासाठी बाहेर पाठवले. थोड्याच वेळात शिपाई ते जॅकेट घेऊन आला आणि इस्त्री करायची आहे बाजूला सरका, असे सांगत बाहेर पडला. त्यानंतर मुख्यमंत्री आता आराम करणार आहेत. किमान अर्धा तास तरी ते बाहेर येणार नाहीत, असा निरोप पाठवण्यात आला.  अर्ध्या तासाने मुख्यमंत्री विश्रामगृहातील मुख्य कक्षात आले. मी काही हार, तुरे आणि गुच्छ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. पक्षप्रवेश असतील तर त्यासाठी आपण नंतर तारीख ठरवू, असे सांगून प्रवेशाच्या आशेने आलेल्या सगळ्यांनाच
त्यांनी धक्का दिला.
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही निवडक स्वयंसेवकांशी त्यांनी चर्चा केली. ग्रामविकासाचे दिलेल्या एक मॉडेलची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीस बाहेर पडले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: