Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय मंत्री अनिल दवे यांचे निधन
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na3
5 नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून दवे यांची प्रकृती ठीक नव्हती. आज सकाळी त्यांना घरीच अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.
मूळचे मध्य प्रदेशचे असलेले अनिल दवे 2009 पासून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी केंद्रीय पर्यावरण, वने व जलस्रोत राज्यमंत्रिपदाचा (स्वतंत्र प्रभार) कार्यभार स्वीकारला होता. प्रकृती बरी नसतानाही ते मंत्रालयात काल रात्री उशिरापर्यंत काम करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेतही त्यांची सायंकाळी उशिरा बैठक झाली होती. दवे यांच्यावर सध्या नर्मदा नदीच्या संवर्धनाची प्रमुख जबाबदारी होती. त्यांनी राज्यसभेच्या जलसंसाधन समितीचे सदस्य म्हणून यापूर्वी काम केले होते. त्याचबरोबर त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले होते. 2010 मध्ये ते जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल विषयक संसदीय मंचाचे सदस्यही होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दवे यांनी आदरांजली वाहिली. एका मित्राच्या आणि चांगल्या सहकार्‍याच्या अचानक झालेल्या निधनाने धक्का बसला आहे. पर्यावरणमंत्री अनिल दवे यांना माझी आदरांजली. समर्पित भावनेने जनतेची सेवा करणारे अनिल दवे कायम स्मरणात राहतील.
पर्यावरण संवर्धन हा त्यांच्या ध्यासाचा विषय होता. मी काही महत्त्वाच्या मुद्यांवर कालच त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने माझे व्यक्तिश: नुकसान झाले आहे, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्र्यांनीही दवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: