Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्याने नागरी स्वच्छतेमध्येही आघाडी घ्यावी : फडणवीस
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन
5 सातारा, दि. 18 : सातारा जिल्ह्याने हागणदारीमुक्त व जलयुक्त शिवार योजनेत नेत्रदीपक कामगिरी केली असून यापुढे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातही आघाडी घेऊन स्वच्छतेमध्ये अव्वल व्हावे,जेणेकरून अन्य जिल्हे त्याचे अनुकरण करतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. जयकुमार गोरे, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर  जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. प्रारंभी केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्‍वेता सिंघल, डॉ. राजेश देशमुख, संदीप पाटील, ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता विष्णू पालवे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे आणि पाचगणी पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी संगणकीय सादरीकरण केले.
मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील यंत्रणेने शासनाच्या प्रमुख योजनांमध्ये अतिशय मेहनतीचे काम केले आहे. अनेक योजनांमध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. 15 जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. गाव जलयुक्त झाल्यानंतरही गावामध्ये सगळे उपचार झाले पाहिजेत. पाण्याबरोबरच वाहून जाणारी मातीही थांबवली पाहिजे, त्या शिवाय हा उपक्रम यशस्वी होणार नाही. गाव चिरकाल जयलुक्त राहण्यासाठी पीक पद्धतीचा महत्त्वाचा विचार करावा लागेल.
‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत 70 हजार शौचालये तयार करून जिल्ह्याने रेकॉर्ड केले आहे. हागणदारीमुक्तीचे हे काम उल्लेखनीय आहे. जिल्ह्याने आता स्वच्छतेकडे जावे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख यांचे त्यांनी अभिनंदन केले. ग्रामीण जनतेला 100 टक्के घरे देणारा देशातील पहिला जिल्हा होऊ शकतो. त्यासाठी काम करा, शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
 संग्रहालयाला 5 कोटी
सातारा शहरात छ. शिवाजी महाराज संग्राहलयाच्या सुरू असलेल्या कामासाठी 5 कोटींची मागणी पालकमंत्री शिवतारे यांनी केली. ही मागणी तत्काळ मान्य करताना मुख्यमंत्र्यांनी अजून चांगले काम करा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.      
‘जलयुक्त शिवार’ पुस्तकाचे प्रकाशन
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘सातारा जलयुक्त शिवार’ सचित्र पुस्तकाचे आणि वार्षिक पत पुरवठा आराखड्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.      
विस्तारित इमातीचे उद्घाटन
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन झाले. या इमारतीच्या 3393.41 चौमी क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी 7 कोटी 82 लाख 3 हजार 621 रुपयांच्या अंदाजित खर्चास सार्वजनिक बांधकाम विभागाने 28 फेब्रुवारी 2013 रोजीच्या शासननिर्णयाव्दारे मान्यता दिली होती. या बांधकामासाठी प्रत्यक्ष 6 कोटी 22 लाख 97 हजार रुपये खर्च आला. या सुसज्ज इमारतीत पार्किंग, दोन मजली इमारतीत जिल्हाधिकारी दालन, निवासी उपजिल्हाधिकारी दालन, बैठक हॉल, संजय गांधी योजना विभाग, आपत्ती निवारण विभाग, ऑडिट शाखा, रोजगार हमी योजना, स्वागत कक्ष, बारनिशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार महसूल व प्रशासन, करमणूक शाखा, रेकॉर्ड रुम, पुरुष व महिला स्वच्छतागृह यांचा समावेश आहे.     
मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, दि. 19 रोजी सकाळी 8.30 वाजता धामणेर, ता. कोरेगाव येथे पंतप्रधान आवास योजना, स्वच्छता भारत अभियान व स्मार्ट व्हिलेज पाहणी करणार आहेत. त्यानंतर 9.45 वाजता न्हावी बुद्रुक येथे पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. 10.05 वाजता पवारवाडी येथे पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करून 10.25 वाजता आर्वी येथे जाणार आहेत. तेथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामाची पाहणी करून हेलिकॉप्टरने किरकसाल, ता. माण येथे जाणार आहेत. सकाळी 11.20 वाजता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळमुक्त धरण, पाझर तलाव दुरुस्ती आणि आदर्श गाव योजनेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता हेलिकॉप्टरने सांगलीकडे प्रयाण करणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: