Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मेडिकल कॉलेजला एक महिन्यात मंजुरी : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:09 AM (IST)
Tags: mn1
शिवाजी संग्रहालयासाठीही 5 कोटी; स्वच्छ भारत अभियानातील कामगिरीसाठी सातार्‍याचे अभिनंदन
5 सातारा, दि. 18 : सातारा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न अनेक वर्षे प्रलंबित आहे. या प्रस्तावात येणार्‍या अडचणी दूर झाल्या असून अंतिम प्रस्ताव वैद्यकीय मंत्र्यांकडे गेला आहे. त्यास एक महिन्यात अंतिम मान्यता मिळून हा प्रश्‍न सुटेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, जिहे-कटापूर आणि वांग-मराठवाडी निधीचा प्रश्‍नही सुटला आहे. त्यामुळे लवकरच ही कामे पूर्ण होतील. पुनर्वसनासाठीही गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेत आहोत, असे सांगून त्यांनी  साताराजिल्ह्याने स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त, पंतप्रधान आवास योजना, जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आणि सातारा जिल्ह्याचे अभिनंदन केले. शिवाजी संग्रहालयाच्या अपूर्ण कामासाठी आवश्यक असणारा 5 कोटींचा निधीही लवकरच देवू, असेही त्यांनी जाहीर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हा नियोजन भवनात त्यांनी सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
ना. फडणवीस पुढे म्हणाले, वांग-मराठवाडी आणि जिहे-कटापूर योजनेचे काम रखडले आहे. वांग-मराठवाडीसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून निधीची कमतरता नाही. पुवर्सनाचा प्रश्‍न तातडीने सोडवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहे. त्याचप्रमाणे हा प्रकल्प निश्‍चित कालावधीत पूर्ण झाला पाहिजे यासाठी पालकमंत्री शिवतारे प्रयत्नशील आहेत. जिहे-कटापूर प्रकल्प अनुशेषाच्या बाहेर घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे अवर्षणप्रवणमधील प्रकल्पासाठी 2500 कोटी निधीची मागणी केली होती. नुकतीच पंतप्रधान कार्यालयात याबाबत बैठक झाली असून या प्रकल्पांना कार्यालयाने तत्वतः मान्यता दिली आहे. 
त्यामुळे 40 टक्के निधी केंद्र सरकार तर 60 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. परिणामी हा प्रकल्प राज्यपालांच्या सूत्राच्या बाहेर आल्याने निधी मिळण्याची व्यवस्था झाली असल्याने या योजनेचे काम सुरू करता येणार आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्‍नही अनेक वर्षे प्रलंबित आहे परंतु या प्रश्‍नातील त्रुटी दूर झाल्या असून अंतिम प्रस्ताव वैद्यकीय मंत्र्यांकडे आहे तो लवकरच मंजूर होऊन एक महिन्यात त्यास अंतिम मान्यता मिळेल. कृषी राज्यमंत्र्यांना कृषी विभागाशी संबंधित असणारी कामे वेगाने पूर्ण करावीत, असे सांगितले असून सामूहिक शेतीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले आहे. जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न असून शिवाजी संग्रहालयाचे काम 5 कोटी रुपये निधीसाठी राहिले आहे. त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देऊ असे आश्‍वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत चांगली झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेचे जिल्ह्यात अतिशय चांगले काम झाले आहे. या कामामध्ये लोकसहभाग मोठा आहे. 2016-17 ची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश दिले आहेत. या योजनेचे दुष्काळी भागातही चांगले काम झाला याचा आनंद असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. ही योजना लोकचळवळ झाल्याने पाण्याचे महत्त्व नागरिकांनी ओळखले असून शुक्रवारी काही गावांना भेट देणार असल्याचे सांगितले. स्वच्छ भारत अभियानामध्येही जिल्ह्याचे काम अतिशय चांगले झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये सर्व गावांना हागणदारीमुक्त प्रमाणपत्र मिळणार आहे. या अभियानात जिल्हा प्रशसानाने प्रचंड काम केले आहे. गेल्या 25 वर्षात जेवढी शौचालये झाली नसतील तेवढी शौचालये या तीन वर्षात बांधून झाली आहेत. त्यानंतर आता जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत स्वच्छ कशी होतील याकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवावेत त्याला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करणार आहे. यामध्येही सातारा जिल्हा प्रथम येईल, असा विश्‍वास वाटतो. प्रधानमंत्री आवास योजनेचे कामही जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने सुरू असून 15 हजार घरांपैकी 7 हजार घरांचे काम सुरू झाले असून उर्वरित घरांचे काम लवकरच सुरू होईल. या योजनेतही सातारा जिल्हा पहिला यावा, अशी माझी अपेक्षा असून त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन काम करेल. जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री, सहपालकमंत्री लक्ष घालतील. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 185 किलोमीटरचे उद्दिष्ट दिले होते. यावर्षी ते उद्दिष्ट वाढवून देणार असल्याचे सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: