Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बॉलीवूडची ‘ग्लॅमरस आई’ पडद्याआड
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन
5 मुंबई, दि. 18 (वृत्तसंस्था) : ‘ब्लॉकबस्टर’ हिंदी चित्रपटांमध्ये अनेक नायकांची ‘आई’, ‘सिंहासन’ मधील करारी सून, ‘तू तू मैं मैं’ मधील खट्याळ सासू आणि मराठी रंगभूमीवरील समर्थ नायिका अशा बहुरंगी भूमिका साकारून सिने आणि नाट्यसृष्टीवर आपला ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. रीमा लागू यांना बुधवारी मध्यरात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मुंबईतील कोकिळाबेन धीरभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. रीमा लागू यांच्या आकस्मिक ‘एक्झिट’मुळे बॉलीवूड व मराठी सिने-नाट्यसृष्टी शोकसागरात बुडाली. त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
     रीमा लागू यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या त्या कन्या होत. लहानपणापासून आईकडून अभिनयाचे धडे गिरवल्याने त्यांचा पाया पक्का झाला होता. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सासू माझी ढांसू अशा दर्जेदार नाटकांमधून त्यांनी आपले अभिनयसामर्थ्य सिद्ध केले. नाना पाटेकरांसमवेत ‘पुरुष’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. दूरदर्शनवरील खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं, दो और दोन पाँच या अत्यंत लोकप्रिय मालिकांमुळे त्या घराघरात पोहोचल्या.
बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे रीमा लागू जगभरात पोहोचल्या. मैंने प्यार किया, आशिकी, हम आपके है कौन, कुछ कुछ होता है, कयामत सें कयामत तक, कल हो ना हो, यासारख्या सिनेमांमधून त्यांनी शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांच्या आईच्या भूमिका केल्या होत्या. ‘ग्लॅमरस आई’ म्हणून त्या रसिकांना आवडल्या होत्या. त्याचबरोबर ‘वास्तव’ चित्रपटातील गुंड रघुभाईच्या कणखर आईची भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकदीने साकारली होती. सध्या त्या महेश भट्ट यांच्या ‘नामकरण’ या मालिकेत दयावंती मेहता ही अत्यंत नकारात्मक भूमिका साकारत होत्या. ही भूमिका त्यांच्या ‘ग्लॅमरस आई’च्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी होती. या गुणी अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनामुळे सिने व नाट्यसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
रीमा लागू यांचा विवाह मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील कलाकार विवेक लागू यांच्याशी झाला होता. मात्र, काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना मृण्मयी लागू ही कन्या आहे. तीदेखील बर्‍याच वर्षांपासून सिने-नाट्यसृष्टीत काम करत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: