Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
‘आयसीजे’चा पाकला दणका; भारताचे पहिले यश
5 हेग, दि. 18 (वृत्तसंस्था) : कथित हेरगिरी प्रकरणी भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज स्थगिती दिली आहे. अंतिम निकाल होईपर्यंत पाकिस्तान जाधव यांना फाशी देऊ शकणार नाही, असे ‘आयसीजे’ने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा दणका दिला असून भारताने पहिले यश मिळवले आहे. दरम्यान, पाकिस्तानने हा निकाल मानण्यास नकार दिला असून राष्ट्रहिताच्या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी गुरुवारी दुपारी भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेतीनच्या सुमारास कुलभूषण जाधव प्रकरणाच्या निकालाचे वाचन सुरू केले. जाधव हे भारतीय नागरिक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. भारताची मागणी व्हिएन्ना करारानुसार योग्यच आहे. कोणत्याही देशांच्या नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत. व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक आणि कायदेशीर मदत मिळाली पाहिजे, असे सांगून न्यायालयाने पाकिस्तानला एकप्रकारे झटकाच दिला. जाधव हे हेर आहेत किंवा नाहीत, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे या न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तान जाधव यांना फाशी देऊ शकणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. पाकिस्तानने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, त्यांना दिलेली शिक्षा बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, व्हिएन्ना करार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करण्यापासून पाकिस्तानला रोखावे आणि ही शिक्षा रद्द करण्यास पाकिस्तान असमर्थ ठरल्यास जाधव यांना भारताच्या ताब्यात देण्याचे आदेश पाकिस्तानला द्यावेत, अशा मागण्या भारताने केल्या होत्या. 
सुनावणीदरम्यान दोन्ही देशांनी आपली बाजू न्यायालयात मांडली. जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्चला अटक करून हेरगिरी व देशविघातक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला, असा दावा भारताने न्यायालयात केला होता. भारताने जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती सोळा वेळा केली होती. ती पाकिस्तानने फेटाळली होती. त्यामुळे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असून पाकिस्तानने मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा युक्तिवाद भारताने केला होता. त्याउलट जाधव हे हेर असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. भारत-पाक यांच्यात द्विपक्षीय करार असून त्यामुळे कॉन्सुलर संबंधांसाठी व्हिएन्ना करार लागू होत नाही. जाधव यांना हेरगिरी व देशविघातक कारवायांमुळे लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, असा युक्तिवाद पाकिस्तानने केला होता. मात्र, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानने मात्र हा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. राष्ट्रहिताच्या कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अधिकार नाही. भारत आपला खरा चेहरा लपवण्यासाठी जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा वापर करत आहे. जाधव यांनी आपल्या कृत्याचा कबुलीजबाब दिला असून त्यासंबंधीचे ठोस पुरावे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी व्यक्त केली तर जाधव यांच्या सुटकेसाठी भारत कोणत्याही पातळीवर प्रयत्न करेल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले
यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: