Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दूध, गूळ, अन्नधान्य करमुक्त होणार
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: na2
जीएसटी ः दैनंदिन वस्तूंवरील कर दरात कपात
5 श्रीनगर, दि. 18 (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत 1,211 वस्तूंवर लावण्यात येणार्‍या करांच्या दरांसंदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये एकमत झाले असून दूध, अन्नधान्य व गूळ करमुक्त होणार आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वस्तूंवरील करांचे दर कमी ठेवण्याबाबतही ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत आज एकमत झाले.
‘जीएसटी’ परिषदेची दोन दिवसीय बैठक श्रीनगरमध्ये आजपासून सुरू झाली. या बैठकीत दैनंदिन वस्तूंवरील कर दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या धोरणांनुसार अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत तर अन्नधान्य, गूळ आणि दूध करमुक्त करण्यात आले आहे.
‘जीएसटी’ अंतर्गत मिठाई, साखर, चहापत्ती, खाद्यतेले, कॉफी आणि कोळसा यावर 5 टक्के कर लावण्यात येणार आहे. केशतेल (हेअर ऑईल), टूथपेस्ट आणि साबणावर 18 टक्के कर लागू होणार आहे. सध्या या वस्तूंवर 28 टक्के अप्रत्यक्ष कर लावला जातो. कोळसा आणि मसाल्यांवर 5 टक्के तर करमणूक, हॉटेल आणि रेस्टॉरंटवर 18 टक्के कर लागणार आहे. छोट्या कारवर 28 टक्केकरासह थोडा अधिभार (सेस) लावला जाणार  आहे. आलिशान (लक्झरी) कारवर 28 टक्के कर आणि 15 टक्के अधिभार लावला जाणार आहे. वातानुकूलन यंत्रणा आणि फ्रिज यांचा समावेश 28 टक्के कराच्या गटात करण्यात आला आहे. सध्या या वस्तूंवर 30 ते 31 टक्के कर लावला जातो. मात्र, ‘जीएसटी’ लागू झाल्यावर या वस्तू स्वस्त होणार आहेत.
दैनंदिन वापराच्या कोणत्याही वस्तूंवर कर वाढवण्यात आला नाही. उलट अनेक वस्तूंवरील कराच्या दरात कपात होणार आहे. काही वस्तू करमुक्त होणार आहेत. महागाईवर परिणाम होऊ नये याचा विचार करण्यात आला आहे. कराचा एकूण बोझा कमी झाल्याने बाजारात उत्साही वातावरण पाहायला मिळेल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
1 हजार 211 वस्तूंपैकी 7 टक्के वस्तू करमुक्त करण्यात येणार आहेत. 14 टक्के वस्तू 5 टक्के कराच्या गटात ठेवण्यात आल्या आहेत. 43 टक्के वस्तूंवर 18 टक्के कर लावला जाणार असून 19 टक्के वस्तूंवर 28 टक्के कर लावण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अथिया यांनी दिली. दरम्यान, सोने आणि बिडीवर किती कर लावला जाणार यावर उद्या (शुक्रवारी) निर्णय होणार आहे. सेवा कराचे दरही दुसर्‍या दिवशी ठरवण्यात
येणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: