Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारतीय महिला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
ऐक्य समूह
Thursday, July 13, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: sp2
5ब्रिस्टल, दि. 12 (वृत्तसंस्था) : पूनम राऊतचे शतक आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकी खेळीनंतरही महिला क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत बुधवारी भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतावर 8 गडी राखून आरामात विजय मिळवला. पूनम राऊतच्या 106 धावा आणि मिताली राजच्या 69 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 7 बाद 227 अशी धावसंख्या उभारली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाची कर्णधार लॅनिंगने नाबाद 76 धावांची खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा विजय आहे. आजच्या पराभवामुळे भारतीय संघाच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
भारताच्या 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात दमदार झाली. बोल्टन आणि मुनी यांनी 62 धावांची सलामी दिली. पूनम यादवने बोल्टनला 36 धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर लगेचच मुनी 45 धावांवर धावबाद झाली. त्यानंतर एलिस पेरी आणि कर्णधार लॅनिंग यांनी 124 धावांची अभेद्य भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचे अपयश आणि गचाळ क्षेत्ररक्षण ही भारतीय संघाच्या पराभवाची मुख्य कारणे ठरली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 बाद 226 धावसंख्या उभारली. सलामीवीर स्मृती मानधना अवघ्या 3 धावांवर तंबूत परतल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर कर्णधार मिताली राज व पूनम राऊत यांनी दुसर्‍या विकेटसाठी 157 धावांची शानदार भागीदारी रचली. या सामन्यात मिताली राजने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. मिताली ही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारी क्रिकेटपटू बनली आहे. त्याचबरोबर सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी ती पहिलीच महिला फलंदाज ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरू होण्याआधी मिताली या विक्रमापासून 34 धावा दूर होती. मितालीने या सामन्यात 69 धावा केल्या तर पूनम राऊतने शानदार 106 धावा फटकावल्या. पूनमने 136 चेंडूंमध्ये 11 चौकारांसह शतकी खेळी साकारली. तिचे हे विश्‍वचषक स्पर्धेतील पहिले आणि एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. या दोघीही बाद झाल्यानंतर इतर भारतीय फलंदाज मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत. भारताने शेवटी अवघ्या 33 धावांमध्ये 5 विकेट गमावल्याने 226 धावांवर समाधान मानावे लागले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: