Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

राजकारणाची दिशा बदलणार?
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: st1
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर बिहारमध्ये राजकारणाची दिशा बदलायची शक्यता असली तरी, महाराष्ट्रात मात्र परस्परांशी सतत भांडण करणार्‍या सत्ताधारी युतीतल्या शिवसेना-भारतीय जनता पक्षाला सत्ता कायम टिकवायची असल्याने, राज्यात तथाकथित भूकंप होण्याची शक्यता नाही.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी दि. 17 जुलै रोजी (आज) मतदान होत असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लावलेली ताकद आणि विरोधी पक्षात पडलेली फूट यामुळे रामनाथ कोविंद यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील अशी भाकीते गेल्या काही महिन्यांपासून वर्तवली जात आहेत. निवडणुकीपूर्वीच याची काही चिन्हे दिसायला लागली आहेत. बिहार- मध्ये नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांची सत्ताधारी आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. नितीश कुमार यांनी राष्ट्रपतिपदासाठी भाजपला दिलेला पाठिंबा, भाजपशी त्यांची वाढलेली जवळीक, सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि कुटुंबाविरुद्ध उघडलेली मोहीम या सर्व घटना बर्‍याच बोलक्या आहेत. बिहारप्रमाणेच या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार हाही चर्चेचा विषय आहे. काडीमोडानंतर परत शिवसेनेने मांडलेल्या संसाराला तीन वर्ष होत आली तरी लग्नातल्या मानापमानावरून सुरू झालेले भांडण काही थांबायला तयार नाही. किंबहुना चारचौघात एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी दोन्ही बाजूची मंडळी सोडत नाहीत. केंद्रात भाजपकडे स्वतःचे बहुमत असल्यामुळे शिवसेनेची गरज नाही. राज्यात शिवसेनेने पाठिंबा काढला तरी अल्पमतातले सरकार चालवण्याची आणि तोडफोड करून बहुमत गोळा करण्याची तजवीज भाजपने केली असल्याची कुजबुज आहे. मात्र राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बाहेरून तजवीज करावी लागणार असताना 25 हजार मते असलेल्या शिवसेनेला दुखावणे शक्य नाही, त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपर्यंत त्यांचे लाड करून नंतर जागा दाखवू असे भाजप नेते खाजगीत नेहमी सांगतात. आता ही निवडणूक झाली असल्यामुळे पुढे काय होणार असा प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडेल असे भाकीत वर्तवले आहे. त्यांच्या मते या भूकंपाचा केंद्रबिंदू जळगाव असेल. त्यांचा रोख एकनाथ खडसे यांच्याकडे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
कोविंद यांची मुंबई भेट
रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार कोविंद शुक्रवारी प्रचारासाठी मुंबईत आले होते. या दौर्‍यात ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ वर न गेल्याने वेगवेगळी तर्कटे मांडली गेली. राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा ‘मातोश्री’ दारी गेले होते. त्यामुळे कोविंद यांच्या जाण्याची गरज नव्हती, असे दोन्ही बाजूनी सांगण्यात आले. परंतु मागच्या निवडणुकीत स्वतः प्रणव मुखर्जी आणि त्यापूर्वीच्या निवडणुकीत श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यावतीने तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील ‘मातोश्री’वर गेले होते. त्यामुळे यावेळी कोविंद यांनीही गेले पाहिजे अशी प्रसारमाध्यमांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील हे दोन्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार होते आणि भाजप तेव्हा विरोधी बाकावर होती. आता शिवसेना रालोआ बरोबर सत्तेत आहे आणि कोविंद रालोआचे उमेदवार आहेत. त्यामुळे कोविंद यांना पाठींबा देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शिवसेनेपुढे नव्हता आणि याची कल्पना असल्यामुळेच भाजपने अवास्तव महत्त्व देण्याचे टाळलेले दिसत आहे. शेतकरी कर्जमाफी, नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध आदी मुद्द्यांवर भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सातत्याने होत असले तरी सत्ता सोडून टोकाची भूमिका घेण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरीच्या काळात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू झाली होती. कर्जमाफीचा गुंता बघता भाजप मध्यावधीची जुगार खेळेल का? याबद्दल शंकाच आहे. मात्र शिवसेनेबाबत भाजपचे धोरण पुढील काळात आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेने राज्याच्या सत्तेवर पाणी सोडले तर त्यांची मुंबईतील सत्ताही अडचणीत आणण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
शिव्या खर्‍या की ओव्या?
शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून भाजपला विरोध करण्याची एकही संधी सोडत नाही आणि ज्यांनी सरकारची कोंडी करणे अपेक्षित आहे त्या विरोधी पक्षाचे नेते मात्र सत्ताधार्‍यांचे गुणगान करताना दिसतात. एक दिवस सरकारवर टीका करायची आणि दुसर्‍या दिवशी त्याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांना मतदारसंघातील कार्यक्रमांना बोलावून त्यांचे गुणगान गायचे’ असे प्रकार अलीकडे वारंवार बघायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर कितीही टीका करो, आंदोलने करो महिन्यातून एखादा बडा मंत्री आणि कधी कधी स्वतः पंतप्रधान बारामतीचा पाहुणचार घेत असतात. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि नारायण राणे यांनी परवा याचेच अनुकरण केले. विखे-पाटील यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री आवर्जून जातात. ‘पक्ष विरोधी नेते’ झाले की काय अशी शंका पक्षातल्याच काही लोकांना आली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने तब्बल एक तपानंतर नारायण राणे आणि उध्दव ठाकरे एका व्यासपीठावर आले होते. कार्यक्रमाचा शिष्ठाचार म्हणून त्यांनी
परस्परांवर टीका करण्याचे टाळले. मध्यंतरी राणे अहमदाबादला जाऊन अमित शहा यांना भेटल्याची चर्चा होती. राणे भाजपच्या वाटेवर असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या प्रविष्टास कोलदांडा घातल्याचे बोलले जात होते. या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या कौतुकाचा वेगळा अन्वयार्थ काढला जाणे स्वाभाविक आहे. अजित पवार यांनी दुतोंडी गांडूळाची उपमा दिली. यामुळे संतापलेल्या शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी अजित पवार रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात असा गौप्यस्फोट केला. खरे खोटे तेच जाणोत. पण यामुळे विरोधकांच्या विश्‍वासार्हतेबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे, विधिमंडळात आणि बाहेर घातलेल्या शिव्या खर्‍या की त्यांच्या कौतुकासाठी गायलेल्या ओव्या खर्‍या असा प्रश्‍न विचारला जात आहे.
‘समृद्धी’ची अवघड वाट !
मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग जमीन संपादनाचा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. 1995 मध्ये युती सरकारात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबईतील 55 उड्डाण पूल बांधून लोक आपले नाव कायमचे लक्षात ठेवतील याची व्यवस्था केली. त्यांचेच अनुकरण करण्याचे ठरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. राज्यातील दहा जिल्हे आणि 30 तालुक्यातून हा मार्ग जाणार असून 790 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी तब्बल 46 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गासाठी तब्बल 21 हजार हेक्टर जमीन लागणार असून भूसंपादनाचा प्रश्‍न दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. बाजारभावापेक्षा चौपट दर देण्याची तयारी दर्शवूनही शेतकरी आपली जमीन द्यायला तयार नाहीत. आजूबाजूच्या परिसरात जमीन खरेदी करून शेतकर्‍यांना पर्यायी जमीन दिली असती तर कदाचित एवढा विरोध झाला नसता. परंतु अनेक ठिकाणी बड्या अधिकारी आणि राजकारण्यांनी जमिनीची खरेदी करून ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार स्वत: या आंदोलनात उतरले आहेत. काँग्रेसही या प्रश्‍नावर आक्रमक आहे. शिवसेनेचे नेहमीप्रमाणे डबल ढोलकी धोरण सुरु आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे रोज उठून सरकारला जे इशारे देत असतात त्यात समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांची जमीन सक्तीने घेतल्यास परिणाम भोगावे लागतील या इशार्‍याचाही समावेश असतो. आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे एकनाथ शिंदे खात्याचे मंत्री म्हणून ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याच्या त्यांना मोबदला देण्यासाठी जातात. यामुळे प्रकल्पाचे काम ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर-पर्यंत सुरू होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: