Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारतीय महिलांची हाराकिरी
ऐक्य समूह
Monday, July 24, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: sp1
5लंडन, दि. 23 (वृत्तसंस्था) : वरच्या फळीतील फलंदाजांनी संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करून विजयाची पायाभरणी केली असताना मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय महिलांना चुरशीच्या लढतीत 9 धावांनी नमवून इंग्लंडच्या महिला संघाने महिला क्रिकेट विश्‍वचषकावर नाव कोरले. ‘क्रिकेट पंढरी’ लॉर्डस्वर रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड असूनही इंग्लंडच्या महिलांनी धीर न सोडता पकड मजबूत करत नेली. विजयासाठी 229 धावांचे आव्हान असलेल्या भारतीय महिलांचा डाव 219 धावांत संपुष्टात आला. अ‍ॅन्या श्रबसोल ही इंग्लंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने 46 धावांत 6 बळी घेतले. मिथाली राजच्या नेतृत्वाखाली 12 वर्षांनी दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठूनही भारतीय महिलांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. मिताली व झूलन गोस्वामी यांची ही शेवटचीच विश्‍वचषक  स्पर्धा असल्याने त्यांच्यासाठी विजेतेपदाची कहाणी अधुरीच राहिली.
बलाढ्य व अनुभवी इंग्लिश संघाला गोलंदाजांनी 7 बाद 228 अशा माफक धावसंख्येत रोखल्यानंतर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घणाघाती शतक ठोकणारी हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर पूनम राऊत यांच्या भागीदारीनंतर वेदा कृष्णमूर्ती व राऊत यांच्या भागीदारीमुळे भारत विजयाच्या नजीक येऊन पोहोचला होता. मात्र, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत व वेदा कृष्णमूर्ती या बाद झाल्यानंतर
भारताची घसरगुंडी उडाली. फलंदाजांनी नाहक फटकेबाजी आणि उतावीळपणे धावा चोरण्याच्या प्रयत्नात विकेट फेकल्या. त्यात मोक्याच्या
क्षणी इंग्लिश गोलंदाज भारतीय महिलांवर दबाव टाकण्यात यशस्वी झाल्या. त्यामुळे इंग्लंडने भारतावर मात करत दीर्घ कालावधीनंतर विश्‍वचषकावर आपले नाव कोरले.
भारताकडून पूनम राऊत व हरमनप्रीत कौर यांनी झुंजार फलंदाजी केली. पूनमने 86 तर हरमनप्रीत कौरने 52 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुफान माजवणार्‍या हरमनप्रीतने परिस्थितीनुसार खेळ करत या सामन्यात आपल्या आक्रमक वृत्तीला मुरड घातली. राऊत व हरमनप्रीत या दोघींनीही आक्रमण आणि बचाव यांची सुरेख सांगड घातली. मात्र, या दोघींचा अपवाद वगळात उर्वरित फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही. त्याचा फायदा इंग्लंडला मिळाला. सुरुवातीला दबावाखाली दिसणार्‍या इंग्लंडच्या गोलंदाज सामन्याच्या शेवटी आक्रमक झाल्या. अ‍ॅन्या श्रबसोलने 6 भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. अंतिम फेरीत तिची ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. दुसर्‍या बाजूने अ‍ॅलेक्स हार्टलेने 2 बळी घेत तिला चांगली साध दिली. भारताच्या दोन फलंदाज अकारण धावबाद झाल्या. यावरून मोक्याच्या क्षणी भारतीय महिलांनी केलेल्या हाराकिरीची कल्पना येईल.
इंग्लंडने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर स्मृती मानधनाने अंतिम सामन्यातही निराशा केली आहे. त्यानंतर कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊत यांनी 38 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या नादात मिताली धावबाद झाली. त्यानंतर मराठमोळ्या पूनम राऊतने हरमनप्रीतच्या साथीत अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. दोघींनी तिसर्‍या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. उपांत्य सामन्यातील फॉर्म कायम ठेवत हरमनप्रीतने अंतिम सामन्यातही अर्धशतक केले. तिने 80 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 51 धावांची खेळी केली. पूनम राऊतने 115 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारांच्या साह्याने 86 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांमध्ये चेंडू जास्त आणि धावा कमी, अशी स्थिती असतानाही भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. खराब फटक्याने वेदा कृष्णमूर्तीचा घात केला. तीच परिस्थिती उर्वरित फलंदाजांचीही होती.
त्या आधी इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर भारतीय गोलंदाजांनी बलाढ्य यजमानांना 7 बाद 228 अशा माफक धावसंख्येत रोखले. इंग्लंडच्या फलंदाज ठरावीक अंतराने माघारी परतल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नताली सिवर आणि सारा टेलरचा अपवाद वगळता कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजीचा व्यवस्थित सामना करता आला नाही. भारतीय गोलंदाजांची सुरुवातीपासून पकड होती. इंग्लंडच्या सलामीवीरांनी फटकेबाज सुरुवात केली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी हळूहळू फासे आवळले. राजेश्‍वरी गायकवाडने इंग्लंडची सलामीची जोडी फोडून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्या पाठोपाठ पूनम यादवने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत यजमानांची अवस्था केविलवाणी केली. कर्णधार हिदर नाईटही काही कामगिरी करू शकली नाही. मात्र, सारा टेलर आणि नताली सिवर यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे इंग्लंड मोठी धावसंख्या गाठणार, असे असं वाटत असतानाच झुलन गोस्वामीने 2 चेंडूंमध्ये 2 बळी मिळवून यजमानांना हादरवले. नतालीने एकटीने अर्धशतक झळकवले. त्यानंतर कॅथरिन ब्रंट व जेनी गन यांच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
भारताकडून झूलन गोस्वामीने 3 बळी घेतले. तिने 10 षटकांमध्ये केवळ 23 धावा दिल्या. पूनम यादवने 2 आणि राजेश्‍वरी गायकवाडने 1 बळी घेत गोस्वामीला चांगली साथ दिली. शिखा पांडेची गोलंदाजी मात्र महागडी ठरली. भारतीय संघात कर्णधार मिताली राज व झूलन गोस्वामी यांचा अपवाद वगळता इतर खेळाडूंना विश्‍वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यातील दबावाचा अनुभव नव्हता. इंग्लंडकडे मात्र यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत खेळलेल्या सात ते आठ खेळाडू होत्या. या अनुभवाचा फायदा त्यांना दबावाखाली खेळताना झाला.
धावफलक : इंग्लंड महिला : लॉरेन विनफिल्ड त्रि. गो. गायकवाड 24, टॅमी बूमाँट झे.
गोस्वामी गो. पूनम यादव 23, सारा टेलर झे. सुषमा वर्मा गो. गोस्वामी 45, हिदर नाईट पायचित गो. पूनम यादव 1, नताली सिवर पायचित गो. गोस्वामी 51, फ्रान विल्सन पायचित गो. गोस्वामी 0, कॅथरित ब्रंट धावबाद 34, जेनी गन नाबाद 25, लॉरा मार्श नाबाद 14, अवांतर 11, एकूण 50 षटकांत 7 बाद 228.
गोलंदाजी : झूलन गोस्वामी 10-3-23-3, शिखा पांडे 7-0-53-0, राजेश्‍वरी गायकवाड 10-1-49-1, दिप्ती शर्मा 9-0-39-0, पूनम यादव 10-0-36-2, हरमनप्रीत कौर 4-0-25-0.
भारतीय महिला : पूनम राऊत पायचित गो. श्रबसोल 86, स्मृती मानधना त्रि. गो. श्रबसोल 0, मिताली राज धावबाद 17, हरमनप्रीत कौर झे. बूमाँट गो. हार्टले 51, वेदा कृष्णमूर्ती झे. सिवर गो. श्रबसोल 35, सुषमा वर्मा त्रि. गो. हार्टले 0, दिप्ती शर्मा झे. सिवर गो. श्रबसोल 14, झूलन गोस्वामी त्रि. गो. श्रबसोल 0, शिखा पांडे धावबाद 4,
पूनम यादव नाबाद 1, राजेश्‍वरी गायकवाड
त्रि. गो. श्रबसोल 0, अवांतर 11, एकूण 48.4 षटकांत सर्वबाद 219.
गोलंदाजी : ब्रंट 6-0-22-0, श्रबसोल 9.4-0-46-6, सिवर 5-1-26-0, गन 7-2-17-0, मार्श 10-0-40-0, हार्टले 10-0-58-2,
नाईट 1-0-7-0.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: