Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

दोन तारे निखळले
vasudeo kulkarni
Wednesday, July 26, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: ag1
स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताचा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या मूलभूत संशोधन आणि विकासासाठी अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जे. भाभा, डॉ. विक्रम साराभाई या शास्त्रज्ञांनी युवक शास्त्रज्ञांना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्यानेच, भारताने या क्षेत्रात विकसनशील राष्ट्रांच्याबरोबरच उत्तुंग झेप घेतली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी भाभा आणि साराभाई यांचे स्वप्न अथक परिश्रमाद्वारे साकार करून जगालाही थक्क केले. भारतीय अस्मितेचा हुंकार जगाने भारतीय अण्वस्त्रांच्या यशस्वी चाचण्यांनी अनुभवला. भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या अफाट बुद्धिमत्तेचा साक्षात्कारही भारतीय अवकाश यानाने चंद्राचा वेध घेतल्याच्या ऐतिहासिक-क्रांतिकारी घटनेने झाला. शून्यातून ज्यांनी अक्षरश: विश्‍व घडवले, त्या शास्त्रज्ञांचा-तंत्रज्ञांचा वारसा जपत, पुढे नेणारे-अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात देशाला भरारी घ्यायच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत नेणारे, दोन तेजस्वी तारे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष यू. आर. राव आणि प्रा. यशपाल यांच्या निधनाने निखळले आहेत. या दोनही शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच नव्या पिढीतल्या युवकांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घ्यायचा आत्मविश्‍वास दिला. स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास घडवायची प्रेरणाही दिली. विज्ञानाचा प्रसार आणि प्रचारही केला. त्यांच्याच कर्तृत्वामुळे भारत सध्या अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि फ्रान्स या देशांशी अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात केवळ बरोबरीच नव्हे, तर या देशांची मक्तेदारी मोडून काढायचा वैज्ञानिक चमत्कारही घडवू शकतो आहे. राव आणि यशपाल या दोन्ही शास्त्रज्ञांनी भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे विस्मरण भारतीयांना कधीच होणार नाही. डॉ. भाभा यांच्या निधनानंतर डॉ. साराभाई यांनी अणुविकास आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्राची जबाबदारी घेतली. तरुण शास्त्रज्ञांना अवकाश भरारीची स्वप्नेही दाखवली आणि ती साकारही झाली. संपूर्ण भारतीय बनावटीचा ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह देशातच निर्मित करण्यात डॉ. राव यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरले होते. हा पहिला उपग्रह रशियन प्रक्षेपकाद्वारे अवकाशात प्रक्षेपित झाला होता. राव हेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे पहिले संचालक झाले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली उपग्रहांच्या प्रक्षेपकांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित झाले. याच तंत्रज्ञानाच्या बळावर भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट 1 आणि इन्सॅट 2 हे दळणवळण यंत्रणेसाठी उपयुक्त असलेले आणि हवामान शास्त्रासाठीचे संवेदन उपग्रह देशात निर्मित झाले आणि भारतीय प्रक्षेपकाद्वारेच त्यांचे यशस्वी प्रक्षेपणही झाले. डॉ. उडुपी रामचंद्र राव हे त्यांचे पूर्ण नाव. एम. एस्सी. झाल्यावर अमेरिकेतल्या मेसॉच्युटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ते उच्च शिक्षण घेत असतानाच डॉ. साराभाई यांनी त्यांना उपग्रहांच्या निर्मितीसाठी भारतात बोलावून घेतले आणि त्यांनी स्वदेशी बनावटीच्या उपग्रहाची निर्मिती करून, देशाला अवकाश युगात नेले. 10 वर्षे ते इस्त्रोचे अध्यक्ष होते. सेवा निवृत्तीनंतर ते थिरुअनंतपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे कुलपती आणि अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. वयाच्या 85 व्या वर्षी शेवटचा श्‍वास घेतानाही त्यांचे वैज्ञानिक कार्य सुरूच होते.  

वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञ
ब्रिटिश राजवटीतल्या पाकिस्तानमधल्या झांग प्रांतात 26 नोव्हेंबर 1926 रोजी जन्मलेले यशपाल यांचे कुटुंब फाळणीनंतर हरियाणात आले. कॅथलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी 1949 मध्ये पंजाब विद्यापीठातून भौतिकशास्त्राची एम. एस्सी. पदवी मिळवली. अमेरिकेतल्या मॅसेच्युएटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून भौतिक शास्त्राची पीएच. डी. मिळवली तेव्हा अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांनी आणि सरकारने त्यांना उच्च पगाराच्या नोकर्‍या देवू केल्या होत्या. पण, या निष्ठावान देशप्रेमी शास्त्रज्ञाने, पैशाच्या अभिलाषेला ठोकरत पुन्हा मायभूमी गाठली आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्स या संस्थेत संशोधन-अध्यापन सुरू केले. ‘कॉस्मिक रेज’ या विषयावर त्यांचे मूलगामी संशोधन सुरू असतानाच 1973 मध्ये इस्त्रोपूर्वी स्थापन झालेल्या अवकाश संशोधन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. या पदावर असताना त्यांनी अवकाश संशोधनाच्या क्षेत्राचा आराखडा तयार करून, या क्षेत्रातल्या मूलभूत संशोधनाचा पाया घातला. तरुण भारतीय तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांची फळीच त्यांनी अवकाश संशोधनाच्या कार्यात गुंतवली. त्यांच्या याच कार्यामुळे अवघ्या दोनच वर्षात भारताला स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करता आले. यशपाल तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक तर होतेच, पण  विज्ञान तंत्रज्ञान या विषयांचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण देशभर व्हावा आणि त्यासाठी शालेय, माध्यमिक-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही विज्ञानाच्या शिक्षणाची ओढ लागावी, असा त्यांचा आग्रह होता. योजना आयोगात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सल्लागार, केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव असताना यशपाल, यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या चाकोरीत आमूलाग्र बदल घडवून आणले. ग्रामीण पातळीपर्यंत आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर व्हावा आणि त्यामुळे विकासाला गती मिळावी, हे धोरण त्यांनी अंमलातही आणले. 1986 ते 1991 या काळात विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी विद्यापीठातून वैज्ञानिक-तांत्रिक संशोधनाच्या कार्याला प्रोत्साहन देणारे धोरण स्वीकारून मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रालाही नवी दिली. विद्यापीठे ही तंत्रज्ञ-वैज्ञानिक घडवणार्‍या देशाच्या प्रयोगशाळा आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. शालेय आणि माध्यमिक विद्यार्थ्यांवरचे अभ्यासाचे बोजड ओझे कमी करायसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या शिक्षण तज्ञांच्या समितीचे ते अध्यक्ष होते. याच समितीने केलेल्या शिफारशींचा स्वीकार करून केंद्र आणि राज्य सरकारांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण करणार्‍या अभ्यासक्रमांचा स्वीकार केला होता. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ते पाच वर्षे कुलगुरूही होते. दूरदर्शनवर बरीच वर्षे नियमितपणे प्रक्षेपित झालेल्या ‘भारत की सोच’ आणि ‘टर्निंग पॉइंट’ या मालिकांद्वारे त्यांनी विज्ञान हा विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला होता. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सन्मानाने
गौरव झालेल्या या शिक्षण तज्ञ आणि ज्येष्ठ वैज्ञानिकाचे 90 व्या
वर्षी निधन झाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: