Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

श्रीलंकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी कोहली आणि कंपनी सज्ज
ऐक्य समूह
Wednesday, July 26, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: sp1
5गॉल, दि. 25 (प्रतिनिधी) : भारतीय भूमीत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना गारद केल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंकेवर त्यांच्याच भूमीत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये गॉल येथील कसोटी गमावल्यानंतर भारताने तीन कसोटींची मालिका 2-1 ने जिंकून कसोटी क्रिकेटमधील आपल्या दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात केली होती. त्याच लंकेच्या भूमीत उद्यापासून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सुरू होत आहे. कर्णधार दिनेश चंदीमल जायबंदी असल्याने लेगस्पिनर रंगना हेराथकडे या कसोटीसाठी लंकेचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली लंकेचा संघ भारताला कशी टक्कर देणार, याची उत्सुकता आहे.
विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवल्यानंतर या संघाने 2015 मध्ये श्रीलंकेचाच पहिला परदेश दौरा केला होता. त्यावेळी गॉल येथील पहिली कसोटी भारताने गमावली होती. मात्र, तेथून उसळी घेत भारताने कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती. त्यावेळी रवी शास्त्री हे टीम डायरेक्टर म्हणून संघासोबत होते. त्या मालिका विजयानंतर भारताने 2016-17 च्या हंगामापर्यंत वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध 17 पैकी 12
कसोट्या जिंकल्या आहेत. लंका दौर्‍यानंतर अनिल कुंबळे हे भारताचे प्रशिक्षक होते. आता पुन्हा रवी शास्त्री यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. युवा आणि आक्रमक कर्णधार विराट कोहलीचे
रूपांतर परिपक्व कर्णधारात झाले आहे. शास्त्री आणि कोहली यांच्यात चांगले समन्वय असल्याने भारतीय संघ आता अधिक
बलशाली झाला आहे.
उद्याच्या कसोटीत सलामीवीर लोकेश राहुल खेळू शकणार नसल्याने शिखर धवनच्या साथीत अभिनव मुकुंद भारताच्या डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत स्वत: कर्णधार विराट कोहलीसमवेत चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा यांची निवड होईल, अशी अपेक्षा आहे. पाच गोलंदाज खेळवण्यावर कोहलीचा कटाक्ष असतो. लंकेतील खेळपट्ट्या फिरकीला पोषक असल्याने अश्‍विन, रवींद्र जडेजा यांच्याबरोबर कुलदीप यादवचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीचा भार उमेश यादव व मोहम्मद शमी हे वाहतील. भुवनेश्‍वरकुमार, ईशांत शर्मा यांना तूर्त संधी मिळण्याची शक्यता नाही. हार्दिक पांड्याला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.
दुसर्‍या बाजूला अँजेलो मॅथ्यूजने नेतृत्व सोडल्याने श्रीलंकेच्या कर्णधारपदी दिनेश चंदीमलची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, चंदीमल जायबंदी असल्याने पहिल्या कसोटीत रंगना हेराथ यजमानांचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे नेतृत्वाचा अनुभव नसला तरी तो संघाचा आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर तो अनुभवी कसोटीपटूही आहे. मायदेशातील खेळपट्ट्यांवर हेराथच्या फिरकीची जादू चालते. त्यामुळे त्याला नेतृत्व करतानाही आत्मविश्‍वास मिळेल.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, अश्‍विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, भुवनेश्‍वरकुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या.
श्रीलंका : रंगना हेराथ (कर्णधार), उपुल थरंगा, दिमुथ करुणरत्ने, कुशल मेेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशान डिकवेला, धनंजया डिसिल्वा, धनुष्का गुणतिलक, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमाल, लाहिरू कुमारा, विश्‍व फर्नांडो, मलिंदा पुष्पकुमार, नुवान प्रदीप.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: