Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

हृदयाचा खंबीरपणा
ऐक्य समूह
Friday, July 28, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: vc1
महात्मा गांधी आफ्रिकेत असतानाची ही गोष्ट. एक दिवस त्यांच्या नावाची तार आली. त्या तारेत त्यांचे थोरले बंधू लक्ष्मीदास हे 8 मार्च 1914 ला पोरबंदरला वारल्याचं कळवलं होतं! ती तार गांधीजींनी वाचली, अन लगेच दुसर्‍याजवळ दिली, ती वाचून तिथल्या त्यांच्या सगळ्या चाहत्यांना फार वाईट वाटलं. पण गांधीजींचं अंत:करण होतं खंबीर. त्यांचा ‘साह्यकर्ता दादा’ गेल्याचं ते दु:खदायक तर होतंच होतं. पण तरीही गांधीजींच्या नित्याच्या क्रमात काही खंड पडला नाही. आपलं काम रोजच्यासारखं ते संध्याकाळपर्यंत करीत राहिले. दररोज संध्याकाळी प्रार्थना ठरलेली. ती आटपली अन् सगळे जण गांधीजींकडे पाहतात, तो त्यांचा कंठ दाटून आला! डोळेही आसवांनी डबडबलेच. पण ते दु:ख गिळून, ते सर्वांना म्हणाले, ‘मी दिवसभर बोललो नाही, पण माझे वडील बंधू गेल्याची ती तार वाचली अन् मला अतिशय दु:ख झालं. पण काही झालं तरी, आपलं दैनंदिन काम हे चाललंच पाहिजे. त्यात खंड पडू देणं योग्य नाही. म्हणूनच या वेळपर्यंत मी कुणालाच काही सांगितलं नाही. मृत्यू हा ईश्‍वराधीन असतो. पण आपलं काम मात्र आपल्या स्वाधीनच.
कथा उपदेश : स्वकर्म सतत करीत राहणं हीच ईश्‍वराची खरी पूजा होय.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: