Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये ‘हिजबुल’च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
ऐक्य समूह
Monday, July 31, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: na1
5श्रीनगर, दि. 30 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या चकमकीनंतर स्थानिकांच्या जमावाने सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक केली. यावेळी सुरक्षा दलांच्या कारवाईत सहा नागरिक जखमी झाले आहेत. या परिसरात आणखी एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी घेरले असून या भागात चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.
पुलवामा जिल्ह्यातील तहाब परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी सकाळी  संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असता दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी ‘हिजबुल मुजाहिद्दीन’शी संबंधित होते. या दहशतवाद्यांकडे एक एसएलआर व एक इन्सास रायफल होती. ही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या चकमकीनंतर स्थानिकांच्या जमावाने सुरक्षा दलांच्या जवानांवर दडगफेक केली. यावेळी जवानांनी केलेल्या कारवाईत सहा जण जखमी झाले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: