Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

सत्तानाट्य पूर्वनियोजितच
vasudeo kulkarni
Monday, July 31, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: vi1
 नितीश यांनी लालूंची साथ सोडावी, असे जाहीर आव्हान बिहारमधील भाजपचे प्रमुख नेते सुशीलकुमार मोदी अनेक वेळा करत होते. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपने सुचवलेल्या रामनाथ कोविंद यांच्या नावाला नितीश यांनी आढेवेढे न घेता पाठिंबा दिला. नितीशकुमार यांनी मोदींच्या वादग्रस्त ठरलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला तेव्हाच बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. लालूप्रसाद यादव यांचा चारा घोटाळा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणीसाठी हाती घेतल्यानंतर तर स्पष्टच झाले की, बिहारमधील सरकार पाडण्यासाठी भाजप संधी साधणार.
सफाईने बांधलेले हे सुनियोजित सत्तानाट्य तितक्याच वेगाने यशस्वी करण्यात आले. लोकसभा निवडणुका केवळ दीड वर्ष दूर आहेत आणि भाजपला पुन्हा केंद्रात सत्ता स्थापण्यासाठी प्रादेशिक पक्षांची नितांत गरज आहे. बिहारमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करूनही नितीशकुमार आपल्या गळाला लागतील, हा आशावाद भाजपने बाळगला. लालू कुठे फसणार याची कदाचित भाजपला जाण असावी. मोदी लाट भरात असताना सरसंघचालकांनी आरक्षणाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने बिहारमधील विजय निसटला. ‘ब्रॅन्ड मोदी’साठी हा जबर धक्का होता.
नितीशकुमार यांचा लालूंशी असलेला कथित ‘दोस्ताना’ भाजपला अंतर्बाह्य अवगत आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर पंचाईत करणे आणि याच मुद्द्यावरून नितीशकुमारांना लालूंपासून दूर करणे या भाजपच्या प्रमुख खेळी होत्या. बिहारमध्ये 90 च्या दशकापासून नितीश-लालू यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्या काळात जनता दलातून वेगळे होऊन नितीश यांनी समता पार्टी हा पक्ष स्थापन केला. लालूंच्या यादवी व भ्रष्ट राजकारणाचा त्यांना तिटकारा होता.
दीड वर्षांपूर्वी भाजपला शिव्या देणार्‍या नितीश यांना लालू भ्रष्टाचारी आहेत याचा साक्षात्कार एकदम कसा झाला? दशरथ मांझी यांच्या गच्छंतीनंतर नितीश यांची प्रतिमा डागाळली होती. अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना दिसत होता. ही भीती ओळखून त्यांनी लालूंसोबत 2015 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना देशाला हिंदुत्ववादी शक्तींचा धोका आहे, असा पवित्रा घेत त्यांनी संघमुक्त देशाची भाषा केली.
परिणामी भाजपला कुरघोडीची आयती संधी मिळाली. मोदी-शहा यांच्या गतिमान राजकारणापुढे लालू व काँग्रेसचे सुस्त राजकारण फिके पडले. नितीशना सत्ता राबविण्याची मोकळीक लालू व काँग्रेस देत नव्हते. ही नाराजी नितीश गेले सहा महिने प्रगट करीत होते. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मोदींचा पर्याय या प्रतिमेत, नितीशना जेरबंद करता येईल या भ्रमात लालू व काँग्रेस राहिले. पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार होण्याची संधी सोडण्याइतके नितीशकुमार नाराज का झाले याचाही विचार केला पाहिजे. विरोधी पक्षांनी नवी भाषा बोलावी असा आग्रह नितीश धरीत होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: