Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

शरीफ बेईमानच
vasudeo kulkarni
Monday, July 31, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: ag1
1990 मध्ये पंतप्रधानपदावर असताना सत्तेचा गैरवापर करून परदेशात कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती केल्याच्या प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्याने, नवाझ शरीफ यांना तडकाफडकी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असीफ सईद खान खोसा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एक मताने दिलेल्या निर्णयात, शरीफ यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिध्द होत असल्याने, त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देताच पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. पाकिस्तानसह जगातील अनेक राष्ट्रातील बडे राजकारणी, श्रीमंत आणि उद्योगपती आपला काळा पैसा पनामा येथे बोगस कंपन्या काढून बेनामी गुंतवणूक आणि संपत्ती मालमत्ता करतात. पनामामधल्या एका कायदा कंपनीने गेल्याच वर्षी अशा बड्या धेंडांची गोपनीय कागदपत्रे फोडून, खळबळ उडवली होती.  या गौप्य स्फोटात जगातील 128 राजकारण्यांची नावे होती आणि त्यात शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लंडनमध्ये केलेल्या मालमत्तेचा तपशीलही होता. पाकिस्तानातील वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणी शरीफ यांच्या चौकशीची मागणी केली तेव्हा, राजकारणात मुरब्बी आणि धूर्त असलेल्या या नेत्याने आपल्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे भ्रष्टाचाराचे खोटे प्रकरण असल्याचा कांगावा केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपरगेट प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीसमोर मात्र शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना उभे राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या समितीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या अहवालात शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय दोषी असल्याचा, लंडनमध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्याबरोबरच त्यांची मुलगी मरियमसह जावयाला, दोन्ही मुलांना आणि माजी अर्थमंत्री इसहाक दार यांना दोषी ठरवून, या सर्वांवर गुन्हे नोंदवून कारवाईचे आदेशही दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश दिल्यावर निवडणूक आयोगाने तशी अधिसूचना काढताच शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामाही दिला आहे. गेली चाळीस वर्षे पाकिस्तानच्या राजकारणात असताना, माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यासह, माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि बड्या दिग्गज राजकारण्यांना नामोहरम करणार्‍या शरीफ यांची पाकिस्तानच्या राजकारणातूनही कायमची हकालपट्टी झाली आहे. या आधीही ते दोन वेळा पंतप्रधान होते. पण, त्यांना एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. 1997 मध्ये ते दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मुशर्रफ यांना बडतर्फ केले होते. पण, मुशर्रफ यांनी त्यांचीच सत्ता उलथवून टाकत देशाची सर्व सत्ता काबीज करून, शरीफ यांना आश्रयासाठी सौदी अरेबियाला पळून जावे लागले होते. जनमताच्या रेट्याच्या पाठिंब्यावर ते पुन्हा पाकिस्तानात आले आणि आपल्या मुस्लीम लीग (नवाज) पक्षाला संसदेच्या गेल्या निवडणुकीत बहुमत मिळवत पुन्हा तिसर्‍यांदा पंतप्रधानही झाले होते. सत्ता मिळताच त्यांनी मुशर्रफ यांच्या मागे चौकशा आणि खटल्यांची खेकटी लावून त्यांचा राजकीय सूडही घेतला होता. पण, अखेर त्यांच्यावरही काळानेच असा सूड घेत,
‘दैव देते आणि कर्म नेते‘, या सुभाषिताची प्रचिती घडवली, ती अशी!

राजकीय अस्थिरता
फाळणीनंतर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात सुरु झालेली राजकीय अस्थिरतेची स्थिती गेल्या 70 वर्षात कायम राहिली ती, लष्कराच्या वर्चस्वामुळेच. पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकारे लष्कर प्रमुखांनी बडतर्फ करायची, देशाची सर्व सत्ता बळकावयच्या घटना सातत्याने घडल्या. लोकनियुक्त सरकारे सत्तेवर आली तरी, खरी सत्ता मात्र लष्कर आणि आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेकडेच कायम राहिली आहे. आतापर्यंतच्या पाकिस्तानच्या एकाही पंतप्रधानाला लष्कराचे वर्चस्व रोखण्यात, कमी करण्यात यश मिळालेले नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या शरीफ यांच्यावर राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयात गुन्हेगारी खटला दाखल होणार असल्याने, पुढच्याच वर्षी होणार्‍या पाकिस्तानी संसदेच्या निवडणुकात माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालच्या मुस्लीम लीगला पुन्हा सत्ता मिळवणे अवघड जाईल. पाकिस्तानातील सध्याच्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार संसद सदस्य नसलेल्या नेत्याला पंतप्रधानपद स्वीकारता येत नाही. त्यामुळेच शरीफ यांची कितीही इच्छा असली तरी, आपले बंधू पंजाबचे गव्हर्नर शहाबाज शरीफ यांना पंतप्रधानपदावर बसवता येणार नाही. त्यांच्या विश्‍वासातील माजी पेट्रोलियम मंत्री शाहिद खाकन अब्बासी यांची सत्ताधारी मुस्लीम लीग (नवाज) यांची हंगामी पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. शहाबाज शरीफ यांची संसदेवर निवड झाल्यावर ते पंतप्रधान होतील. पण, सध्याच्या राजकीय अस्थिरतेचा लाभ उठवत लष्कर प्रमुख कमर असिफ बाज्वा यांच्या कारवायांवरही लोकनियुक्त सरकारचे भवितव्य अवलंबून राहील. खोटारड्या शरीफ यांची सत्ता गेल्याने, येत्या निवडणुकीत आपल्या  ‘तहरीक ए इन्सान’, या पक्षाला, यश मिळण्याची स्वप्ने माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना पडत असली तरी, या पक्षाला पाकिस्तानी जनतेने सातत्याने झिडकारलेले आहे. भुट्टो यांच्या पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व सिंध वगळता अन्य राज्यात नाही. शरीफ यांच्या सरकारने गेल्या तीन वर्षात उदारमतवादी आर्थिक धोरणाचा स्वीकार करत, देशातील गरिबी कमी करण्यात, विकासाचा आर्थिक दर वाढवण्यात यश मिळवले होते. इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेचा दबावही त्यांनी झुगारला होता. शरीफ यांच्या सरकारच्या कारभाराबाबत पाकिस्तानी जनतेला विश्‍वासही वाटत होता. पण, त्यांनी केलेला भ्रष्टाचार आता न्यायमंदिरातच सिध्द झाल्याने, त्यांच्या लोकप्रियतेला लागलेले खग्रास ग्रहण, त्यांच्या पक्षालाही महागात पडेल. शरीफ यांच्यावरचा जनतेचा विश्‍वास तर उडालाच आणि त्यांच्या इतका कुशल नेता त्यांच्या पक्षाकडे नसल्याने नव्या पंतप्रधानावर लष्कराचे वर्चस्व अधिकच वाढल्याशिवाय राहणार नाही. लष्करानेच धर्मांध इस्लामी दहशतवाद पोसला असल्याने पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेचा दूरगामी परिणाम त्या राष्ट्रावर आणि धर्मांध दहशतवाद्यांवर होण्याची शक्यता आहे. नव्याने सत्तेवर येणार्‍या सरकारला न जुमानता हे लष्कर काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांना अधिकच प्रोत्साहन देण्याचा गंभीर धोका असल्याने, भारताला अधिकच सावध राहावे लागेल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: