Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

कल्पवृक्ष
ऐक्य समूह
Thursday, August 03, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: vc1

एकदा एक माणूस अरण्यात भटकत होता. अतिशय थकल्याने तो एका घनदाट वृक्षाखाली बसला. योगायोगाने तो कल्पवृक्ष होता. तहानेने व्याकूळ झाल्याने त्याच्या मनात आले, या अरण्यात पाणी मिळेल काय असा विचार करीत असतानाच त्याच्या पुढ्यात जलकुंभ येऊन थांबला. आश्‍चर्यचकित होऊन पाणी पिऊन त्याने तहान शमविली. काही वेळाने भूक लागल्याने त्याने उत्तम भोजनाची इच्छा केली असता विविध पदार्थांनी व पक्वान्नांनी भरलेले भोजनाचे ताट त्याच्या पुढ्यात आले. भोजन करून तो तृप्त झाला. भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी असा विचार करताच एक सुंदर शय्या तेथे स्थापित झाली व तो त्यावर सुखनैव विश्रांती घेऊ लागला. झोपून उठल्यावर त्याने पाहिले, की सूर्यकिरणे संधिकाळात पसरली होती. त्याने विचार केला, आता तर संध्याकाळ झाली. या वनात राहाणे आता युक्त नाही, एखादा हिंस्र प्राणी किंवा सिंह येऊन मला खाऊन तर टाकणार नाही ना असा त्याने विचार करताच एका सिंहाने येऊन त्याच्यावर झडप घालून त्यास खाऊन टाकले.

कथा उपदेश : आपले मनच कल्पवृक्षाप्रमाणे असते. जशी इच्छा तशी फळे!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: