Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डीपीसीसाठी कराडमध्ये भाजपची खलबते
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 6 : सातारा जिल्हा नियोजन समितीसाठी सोमवार, दि. 7 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी भाजपच्या सर्व मतदारांसह पदाधिकार्‍यांसमवेत रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक  घेवून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कराड येथे झालेल्या भाजप पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांच्या बैठकीस सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजपचे प्रवक्ते अ‍ॅड. भरत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, अनिल देसाई, दीपक पवार, महेश शिंदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केल्या जाणार्‍या जोडाजोडी-फोडाफोडीवर सत्तेची गणिते जुळवली जाणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपने उभ्या केलेले उमेदवारांच्या विजयासाठी नेत्यांनीही मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रविवारपर्यंत कराडच्या शासकीय विश्रामगृहात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह उपस्थित असलेल्या 7 जिल्हा परिषद सदस्य, 11 नगरपंचायतींचे नगरसेवक आणि   22 नगरपालिकेच्या नगरसेवकांना मतदानाबाबत मार्गदर्शन करुन भाजप पदाधिकार्‍यांना पक्षादेश पाळण्याबाबत सूचना केल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: