Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘वॉटर कप’ स्पर्धेत भोसरेचा डंका
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: mn1
राज्यात दुसरा क्रमांक; ‘मनसंधारणा’मुळे यश
5वडूज, दि. 6 (मुन्ना मुल्ला) : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या ‘पानी फौंडेशन’च्यावतीने घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात आपला डंका वाजवला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांची जन्मभूमी असलेल्या या गावाने या स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. जलसंधारणाच्या जोडीने गावात ‘मनसंधारण’ही केल्याने हे यश मिळवल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या यशामुळे भोसरे गावात प्रचंड जल्लोष सुरू आहे.
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी राज्यात जलसंधारणासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी ‘पानी फौंडेशन’ची स्थापना केली आहे. या फौंडेशनच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉटर कप’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा 30 तालुक्यांमधील गावांनी भाग घेतला होता. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलातील शानदार सोहळ्यात या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येऊन बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान, उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी, मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, ‘पानी फौंडेशन’चे सत्यजित भटकळ यांच्यासमवेत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ व चार हजार गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे गावात ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
‘एकीचे बळ, मिळते फळ’ याची प्रचिती या यशामुळे आली. सर्वांनी गट-तट बाजूला ठेवून पाणी फौंडेशनच्या कामासाठी वाहून घेतले. सर्व गावकर्‍यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवत रात्रंदिवस कष्ट करून आपल्या गावास पाणीदार बनवले. जलसंधारणाबरोबर ‘मनसंधारण’ करण्यातही आम्ही यशस्वी झालो, अशा बोलक्या प्रतिक्रिया वयोवृद्ध ग्रामस्थांमधून व्यक्त होत होत्या. सर्व गावकर्‍यांचे आणि एकीचे हे यश असून ही एकी कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया काही प्रमुख ग्रामस्थांनी दिली. जलसंधारणाचे महत्त्व संबंधितांनी पटवून दिल्यामुळे आणि अभिनेते आमिर खान यांच्यासोबत डॉ. अविनाश पोळ आणि तहसीलदार विश्‍वास गुजर यांच्या मार्गदर्शनामुळे गावात भरीव काम झाले. ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने भोसरे परिसरात 21 शेततळी, 12 सिमेंट नालाबांध, 116 कंपार्टमेंट आणि एकूण 863 हेक्टर क्षेत्रात चौफेर ‘डीप सीसीटी’ झाल्याने 18.894 कोटी लीटर पाणीसाठा होईल. या कामामुळे आमचे गाव भविष्यात निश्‍चित पाणीदार होऊन आजपर्यंतची दुष्काळी स्थिती कायमस्वरूपी बदलून जाईल, असा विश्‍वास गावातील प्रत्येकाने बोलून दाखवला. राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याने गावात आनंदोत्सव, करण्यात येत आहे.
आमिर, किरण राव यांना स्वाइन फ्लू
दरम्यान, ज्यांच्या पुढाकारामुळे ‘वॉटर कप’ स्पर्धा सुरू झाली, ते आमिर खान व किरण राव या दोघांनाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ते बालेवाडीतील या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची चुटपूट सर्वांनाच लागून राहिली. खुद्द आमिर खाननेच ही माहिती या सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. या सोहळ्यास आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगत आमिर खानने सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्याला आणि पत्नी किरण रावला स्वाइन फ्लू झाल्याचेही त्याने स्पष्ट केले. स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णाला आराम करण्याची आणि औषधे घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपण या सोहळ्यास हजर राहू शकलो नाही, असे आमिरने सांगितले. सर्व विजेत्यांचे आणि सहभागी गावांचेही त्याने आभार मानले. या सोहळ्यास सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, उपस्थित राहू शकत नसल्याचे वाईट वाटत आहे, असेही आमिर व किरण राव यांनी सांगितले. या कार्यक्रमात आमिरचा प्रतिनिधी म्हणून शाहरूख खान उपस्थित होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: