Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलीस दलातील गाडीच्या काचांवरच ‘फिल्मिंग’
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: lo1
सातारा शहर वाहतूक शाखेची मोहीम थंडावली?
5सातारा, दि. 6 : सातारा वाहतूक शाखेने फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या रंगाच्या फिल्मिंगच्या काचा असलेल्या गाड्यांवर सुरू केलेली कारवाईची मोहीम एकाच दिवसात थंडावली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या गाडीवरही कारवाई केल्याने वाहतूक शाखेच्या खमकेपणाची चर्चा सुरू होती. मात्र, पोलीस दलातीलच एकाच्या टाटा सफारी (एमएच-11-एबी-0401) या गाडीच्या काचांवरील काळे फिल्मिंग तसेच असून ती पोलीस मुख्यालयासमोर उभी होती तरीही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे वाहतूक शाखेची मोहीम तात्पुरती होती का आणि अशी सर्वसामान्यांना एक न्याय आणि पोलिसांना वेगळा न्याय का, असे प्रश्‍न सातारकर उपस्थित करत आहेत.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा चंग बांधला आहे. त्याचबरोबर गाड्यांच्या नंबरप्लेट आणि काचा नियमानुसार असल्या पाहिजेत, 
असा संदेश देण्यासाठी फॅन्सी नंबरप्लेट आणि काचांवर काळे फिल्मिंग करणार्‍या वाहनांवर गुरुवारी कारवाई केली होती. या मोहिमेचे नागरिकांनी कौतुकही केले. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या गाडीवरही कारवाई केली. त्यामुळे वाहतूक शाखा प्रशंसेस पात्र ठरली आहे. या कारवाईची शहरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चा झाली होती. त्या दिवशी वाहतूक शाखेने 222 गाड्यांवर कारवाई करून 56 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, दुसर्‍या दिवसापासून ही कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. त्यातच पोलीस दलातील एकाच्या टाटा सफारी गाडीच्या काचांवर काळे फिल्मिंग असल्याचे समोर आले आहे. ही गाडी पोलीस मुख्यालयासमोर उभी असतानाही त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक न्याय आणि पोलिसांसाठी वेगळा न्याय, असा वाहतूक शाखेचा खाक्या आहे का, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
त्याचबरोबर वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही मोहीम अचानक राबविली जाते आणि लगेच बंदही केली जाते. या मोहिमांमध्ये सातत्य का नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. काचांवरील काळ्या फिल्मिंगवरील कारवाई, हे त्याचेच ताजे उदाहरण आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने आपल्या मोहिमांमध्ये सातत्य ठेवावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: