Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘डीपीसी’साठी 387 जणांचे मतदान, 3 मतदार गैरहजर
ऐक्य समूह
Tuesday, August 08, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: mn1
फोडाफोडीच्या राजकारणावर विजयाची गणिते; जि. प. साठी शंभर टक्के मतदान
5सातारा, दि. 7 : साताराजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नगरपालिका मतदार-संघातील दोन आणि नगरपंचायत मतदारसंघातील एका मतदाराने मतदान केले नाही. त्यामुळे एकूण 390 पैकी 387 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद मतदारसंघात 100 टक्के मतदान झाले. 
नगरपालिका मतदारसंघात 98.95 टक्के आणि नगरपंचायतीसाठी  99.26 टक्के इतके मतदान झाले. जिल्हा नियोजन समि-तीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानासाठी मोठी मोर्चेबांधणी पहायला मिळाली. मतदाना-साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मातब्बर नेत्यांची दिवसभर गर्दी होती. निवडणुकीचा निकाल बुधवार, दि. 9 रोजी लागणार आहे. त्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणात जे यशस्वी झाले असतील त्यांच्या बाजूने निकाल लागेल, अशी परिस्थिती आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी एका मतदाराच्या मतदानावर आक्षेप घेणारी तक्रार  केली. ही तक्रार वगळता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत झाली.
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या 40 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 11 जागा जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 29 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. या जागांसाठी सोमवारी मतदान झाले.  जिल्हा नियोजन समितीसाठी  जिल्हा परिषद, नगरपालिका आणि  नगरपंचयात असे तीन मतदारसंघ होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुध्द सर्व विरोधक असा सामना झाला. 
राष्ट्रवादीकडे नगरपालिका आणि नगरपंचायत मतदारसंघ जिंकण्यासाठी थोडी मते कमी होती. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येवून राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये भाजपची काही मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना देण्याची खेळी भाजपने खेळल्याची चर्चा आहे. ही चर्चा निकालानंतरच खरी का खोटी ते सिध्द होणार आहे.
सोमवारी सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिले मतदान जिल्हा परिषदेच्या तळदेव गटाच्या सदस्या प्रणिती जंगम यांनी केले. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील मतदार येवू लागले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. मतदारांशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून उमेदवारांबरोबर त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आत येत असल्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागत होती. मतदान सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी होती. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच फलटणचे काँग्रेसचे काही मतदार आले. त्यांच्यासमवेत रणजितसिंह नाईक-निंबाळकर होते. मात्र त्यांच्यामागे असणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. हे कार्यकर्ते पुढे आणि पोलीस त्यांच्या मागे असे चित्र होते. अखेर पोलिसांनी पुढे जात या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा परिषद 1.56 टक्के, नगरपंचायत 27.94 टक्के तर नगरपालिकेसाठी 23.68 टक्के मतदान  झाले होती. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग अतिशय संथ होता. मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवनात सुरु होती तर दुसरीकडे खा. उदयनराजे भोसले समर्थक आणि शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक शासकीय विश्रामगृहात सुरू होती. खा. उदयनराजे भोसले यांनी रविवारी कोयना दौलतवर जावून आ. शंभूराज देसाई यांच्याशी दिलखुलासपणे विविध विषयांवर चर्चा केली होती. सोमवारी मात्र, थोडे उलटे झाले आणि शंभूराज देसाई दुपारच्या सुमारास उदयनराजे यांच्या जलमंदिर निवासस्थानी त्यांना भेटायला गेले होते. येथे त्यांची आणि उदयनराजे यांची जवळपास दोन तास चर्चा झाली. ही चर्चा जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसंदर्भातच झाली असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या नेत्यांची बैठकही शासकीय विश्रामगृह आणि अनिल देसाई यांच्या निवासस्थानी सुरू होती. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, मनोज घोरपडे, अनिल देसाई, नगरसेवक धनंजय जांभळे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. थोड्याच वेळात सातारा विकास आघाडीचे आणि कराड नगरपालिकेतील नगरसेवक मतदानासाठी आले. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार जिजामाला नाईक-निंबाळकर मतदानासाठी आल्या. त्यांच्यासमवेत कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. यावेळी झालेले मतदान जिल्हा परिषद 3.13 टक्के, नगरपंचायत 52.94 टक्के, नगरपालिका 40 टक्के असे होते.
दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा वेग पुन्हा कमी झाला होता. मतदार कुठे आहेत, याचा शोध घेण्यात येत होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच थांबून होते. ते प्रत्येक मतदार आणि उमेदवारांशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना सूचना देत होते. राजकुमार पाटील आणि निवास शिंदे यांच्याकडे मतदारांना केंद्राच्या बाहेर आणून सोडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परणिामी मतदानाचा वेग पुन्हा वाढू लागला. यावेळपर्यंत झालेल्या मतदानाचा आकडा जिल्हा परिषद 21.88 टक्के, नगरपंचायत 97.79, नगरपालिका 66.84 टक्के इतका होता.
दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात खा. उदयनराजे भोसले यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे समर्थकही येथे मोठ्या संख्येने जमले होते. उदयनराजेंच्या गाडीतून काही मतदार उतरले आणि त्यांनी जावून मतदान केले. यानंतर उदयनराजे येथून बाहेर पडले. मात्र, त्यांचे समर्थक सुनील काटकर, रवी साळुंखे कार्यकर्त्यांकडून आढावा घेत होते. जे मतदार आले नव्हते त्यांना मतदान केंद्रात आणण्यात येत होते. काही वेळाने आ. मकरंद पाटील आणि पाठोपाठ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आले. त्यांच्यासमवेत काही मतदार होते. हे सर्व मतदार जिल्हा परिषद मतदारसंघातील होते. त्यांनी मतदान केल्यानंतर मात्र, येथील मतदानाची टक्केवारी साडेचार वाजेपर्यंतच शंभर टक्के झाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: