Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’मधून हकालपट्टी
ऐक्य समूह
Tuesday, August 08, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: mn2
मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील: खोत
5पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा चौकशी समितीने सोमवारी केली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसंबंधी शंका वाटत असल्याने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिली. सरकारमधून बाहेर पडायचे, की नाही, याचा निर्णय मात्र संघटनेने लांबणीवर टाकला आहे. दरम्यान, आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे, असे सदाभाऊंनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली. मंत्रिमंडळातील जागा स्वाभिमानी पक्षाची असून सदाभाऊंनी पद सोडावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व समितीचे सदस्य प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि समितीचे सदस्य रविकांत तुपकर आणि समिती सदस्य सतीश काकडे उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीसमोर सदाभाऊ खोत यांनी 21 जुलै रोजी हजेरी लावत आपली बाजू स्पष्ट केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, चौकशी समितीने विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली असून आता निर्णयाचा चेंडू चौकशी समितीच्या कोर्टात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या निर्णयानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन. यापुढे मी कुठल्याही समितीसमोर चौकशीसाठी जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.  त्यावर सदाभाऊ आणि समितीमध्ये चांगल्या प्रकारे चर्चा झाली; परंतु समितीच्या निर्णयानंतरच माझी भूमिका जाहीर करेन, या सदाभाऊंच्या भूमिकेवर आम्ही समाधानी नसून याबाबतचा अहवाल चार दिवसात तयार करून पाठवला जाणार आहे.  
त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल, असे चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी सांगितले होते.  त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला. चौकशी समितीने सदाभाऊंची हकालपट्टी करणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाला खा. राजू शेट्टी यांची संमती आहे की नाही, याचा विचार न करताच हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारमधून बाहेर पडायचे की नाही हे एक समिती नेमून ठरवले जाईल. त्यानंतर ते जाहीर केले जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.
चारित्र्याभोवती संशयाचे धुके
सदाभाऊ खोत यांच्या नैतिक वर्तनाची काही दिवसांपासून जाहीर चर्चा होऊन त्यांच्या चारित्र्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम संघटनेच्या नैतिक शिस्तीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो, असे मत समितीने व्यक्त केले आहे. सावंत म्हणाले, भाजपने निवडणुकीत शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा भंग केल्याचे दुःख सदाभाऊंना झाल्याचे अजिबात दिसत नाही. मागील काही दिवसांपासून त्यांच्या चळवळीवरील निष्ठेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. संघटनेचा विचार सत्ता परिवर्तनाचा नसून कष्टकर्‍यांच्या घामाला न्याय मिळवून देण्याचा आहे. सदाभाऊ हे त्यामध्ये बसणारे नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
शिवाय अशा व्यक्तीला काढून टाकण्यास तुम्ही विलंब का करत आहात, असा सवाल शेतकरी स्वाभिमानी संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनेशी संबंध आलेल्या, न आलेल्या अनेकांकडून आम्हाला विचारला जात होता. या सर्वांचा विचार करून सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्वरित काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतल्याचे सावंत यांनी सांगितले.
मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील
दरम्यान, हकालपट्टीच्या निर्णयानंतर सदाभाऊ खोत यांनी पक्षाचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आपण
मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. संघटनेने आपला निर्णय घेतला आहे; पण मंत्रिपदाबद्दल मुख्यमंत्री आणि भाजप निर्णय घेईल. ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असे खोत यांनी स्पष्ट केले. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्‍नावर, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: