Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा नगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवकांचे धरणे आंदोलन
ऐक्य समूह
Thursday, August 10, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: lo2
साविआमध्ये उभी फूट : अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत माघार नाही : लेवे
5सातारा, दि. 9 : श्रीमंत अभयसिंहराजे संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण काढ-ण्याच्या मुद्यावर सातारा विकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. साविआचे नगरसेवक व आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांनी अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी  पालिकेच्या दारात धरणे आंदोलन करत सत्ताधार्‍यांनाघरचा आहेर दिला. साविआच्या गटनेत्या स्मिता घोडके यांच्या मध्यस्थीचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला. अतिक्रमण काढण्याची ठोस कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुुरूच ठेवणयचा इशारा लेवे यांनी दिला. त्यामुळे सातारा पालिकेत आणि सत्ताधार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्री. छ. प्रतापसिंह महाराज(थोरले) नगर वाचनालयासमोर असलेल्या श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलामधील पार्किंगच्या जागेत व्यावसायिकांचे अतिक्रमण होऊ देऊ नये, अशी मागणी शनिवारी वसंत लेवे यांनी केली होती. त्या प्रकरणी ठोस कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे शनिवारी  अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र त्यानंतर दोन दिवसात संबंधिताने पुन्हा त्या ठिकाणी मूर्ती विक्रीच्या स्टॉलचे अतिक्रमण केले. त्यामुळे वसंत लेवे नाराज झाले. नाराज झालेल्या वसंत लेवे यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता पालिकेच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन सुरू केले. यामध्ये नगरसेविका सुनीता पवार, माजी नगरसेविका हेमांगी जोशी व काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुपारी सातारा विकास आघाडीच्या गटनेत्या स्मिता घोडके, नियोजन समितीचे सभापती अल्लाउद्दीन शेख, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी वसंत लेवे, सौ. पवार यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये बेसमेंटमधील विक्रेत्याचे अतिक्रमण काढण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी वसंत लेवे यांना केली. 
यावेळी वसंत लेवे यांनी मंगळवार तळे रस्त्यावर, नो हॉकर्स झोनमध्ये बसणारे विक्रेते, वडाप वाहनांचा बेकायदेशीर थांबा, भाजी विक्रेते यांना हटवून हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा.  व्यापारी संकुलात 100 ते 150 वाहनांच्या पार्किंगची सोय होऊ शकते. परंतु, ही जागाच स्टॉलनी घेतल्यामुळे गाळेधारकांनाही त्यांची वाहने रस्त्यावर लावण्याची वेळ आली आहे. याबाबत प्रशासनाला अडीच महिन्यांपूर्वी अर्ज दिला होता. त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या अनधिकृत अतिक्रमणांना सत्ताधारी आघाडीतीलच काही नगरसेवक पाठबळ देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ठोस कारवाईचा आग्रह धरत त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: